सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : ६ नोव्हेंबरला रात्री गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाने एका आलिशान कारमधून वाहतूक होतांना देशी दारूचे 17 बॉक्स किंमत 56 हजार 712 रुपये व कार (WB 06 E 2777) किंमत 3 लाख रुपये असा एकूण 3 लाख 56 हजार 712 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
शहरातील दिपक चौपाटी येथून मोक्षधाम मार्गे रासा येथे दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी मोक्षधाम रस्त्यावर सापळा रचला. बुधवारी रात्री 10 वाजता या मार्गाने एक आलिशान कार येतांना पोलिसांना दिसली. पोलिसांनी ती कार थांबवून कारची झडती घेतली असता त्यात देशी दारूचे 17 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी कार चालकाला दारू विक्रीच्या परवान्याबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला दारूचा साठा कुठे नेत आहे असे विचारले असता त्याने रासा येथे नेत असल्याचे सांगितले. दारूचा परवाना नसतांना दारूची वाहतूक करणाऱ्या सौरभ किशोर नगराळे (23) रा. राजूर कॉलरी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळून देशी दारूचे 17 बॉक्स किंमत 56 हजार 712 रुपये व कार किंमत 3 लाख रुपये असा एकूण 3 लाख 56 हजार 712 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई 6 नोव्हेंबर च्या रात्री दहा वाजता च्या सुमारास करण्यात आली.
आरोपी सौरभ नगराळे याच्यावर पोलिसांनी मदकाच्या कलम 56 (अ) (इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
मागील काही दिवसांत पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कार्यवाही केली. अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस विभाग आपलं कर्तव्य बजावत असतांना उत्पादन शुल्क विभाग मात्र स्वस्थ बसला आहे. यामागचं कारण अधिकारीच अवैध दारू विक्रेत्यांच्या दावणीला बांधले गेल्याने कार्यवाही करणार तरी कोण, ही खुली चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.