सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. या समस्या त्वरित सोडवण्याच्या सूचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 12 सप्टेंबर रोजी भालर आणि ऊर्जापुर ताडाळी येथील वेकोलि मुख्य महाप्रबंधक कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी वेकोलि क्षेत्रातील गावांमधील समस्यांचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी खा. प्रतिभा धानोरकर यांच्यामार्फत या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि त्या सोडवण्यासाठी निवेदन दिले.
प्रमुख समस्या आणि मागण्या:
वेकोलिच्या घोन्सा कोळसा खाणीसाठी कुंभारखनी येथील शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, सिंचित जमिनी असतानाही विस्थापित शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीच्या दराने भरपाई देण्यात येत आहे. हे अन्यायकारक असून, वेकोलिच्या नियमांनुसार सिंचित जमिनींच्या दराने भरपाई देण्याची मागणी संजय खाडे यांनी केली. यासोबतच, विस्थापित शेतकऱ्यांना तातडीने वेकोलित रोजगार देऊन, त्यांना त्यांच्या जवळच्या खाणींमध्येच नोकरी मिळावी, अशी मागणीही करण्यात आली. वेकोलिने घोन्सा गावातील मुख्य रस्ता बांधुन देण्याचे आश्वासन काही वर्षापूर्वी ग्रामस्तांना दिले होते परंतू ते अद्याप पूर्ण केले नाही, त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
खाण प्रभावित उकणी, पिंपळगाव, जुनाडा, बोरगाव, अहेरी, कोलेरा-पिंपरी, निलजई, बेलोरा, मुंगोली, कोलगाव या गावांतील उर्वरित शेतजमिनींचे संपादन लवकरात लवकर करावे व त्यानंतर उकणी, पिंपळगाव, कोलेरा-पिंपरी या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.स्थानिक बेरोजगार युवकांना वेकोलिसोबत काम करणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये प्राधान्याने नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, ब्राह्मणी (निळापूर) येथील कोलवॉशरीमुळे होणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळावा, असा आग्रह धरण्यात आला.
इतर मागण्या:
निळापूर येथील गुंडा नाल्यावर पूल बांधावा, कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालावा आणि वणी ते अहेरी रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या 20 वर्षांपासून रखडलेल्या मोबदल्याची त्वरीत पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली. ओबी टाकल्यामुळे ब्राह्मणी नवीन वस्ती येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांनाही मोबदला मिळावा, तसेच लालगुडा ते उकणी रस्त्याची दुरुस्ती, वणी ते प्रगती नगर कॉलनीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंटिकरण करावे, अशी मागणी होती.
चारगाव चौकी-शिंदोला-कोरपना रस्त्यावरील ओव्हरलोड वाहतूक थांबवून त्या रस्त्याचे सिमेंटिकरण करावे आणि शिंदोला-येनक-येनाडी-मंगोली रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे, या रस्त्यालगत शेतजमिनी असलेल्या धूळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही पुढे करण्यात आली.
आंदोलनाचा इशारा:
वणी आणि वणी नॉर्थ क्षेत्रातील समस्यांबाबत अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही वेकोलि प्रशासनाने त्यांची योग्य ती दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या समस्यांकडे वेकोलिने त्वरित लक्ष न दिल्यास गावकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संजय खाडे यांनी दिला आहे. यावेळी डॉ. शंकर वऱ्हाटे, तेजराज बोढे, प्रमोद वासेकर, संजय सपाट, विलास डाहुले, मंगेश मोहुर्ले, विजय जिवने, रामटेके सर, भिमराव चिडे, फरिप शेख, प्रमोद पोटे, इतर पदाधिकारी, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.