सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरात जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात. लोक मशिदींमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि प्रेषित पैगंबर मुहम्मद साहेब यांचे स्मरण करतात. यानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शहरातील मोमीनपुरा येथून शोभायात्रा काढण्यात आली.
ईद निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. तसेच शहरात ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सोबतच विविध उपक्रम राबवण्यात आलेत. दरम्यान,असंख्य मुस्लिम बांधव या उत्सवात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मोमीनपुरा येथील हयात मज्जिदपासून शोभायात्रेला सुरुवात झाली. मोमीनपुरा, इंदिरा चौक, खाती चौक, टिळक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, जामा मशीद, दीपक टॉकीज या मार्गाने ही शोभायात्रा गेली. या शोभा यात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. मोमीनपुरा येथील हयात मज्जिद जवळ या शोभायात्रेची सांगता झाली.
या सोहळ्यात सर्व मज्जिदचे इमाम साहेब तथा सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने जनसमुदाय असतांना सुद्धा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला,हे विशेष..