सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : लग्नानंतर मेहदीचा रंगही तिच्या हातातून उतरला नव्हता, आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता वणी शहराल गतच्या लालगुडा परिसरात असलेल्या सबा कॉलनीत उघडकीस आली. देवयानी नीरज चट्टे (24) असे मृत विवाहिताचे नाव आहे. पोलिसांना मृतकाच्या खोलीतून 15 पानी सुसाईड नोटही सापडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या नीरज बबनराव चट्टे यांनी काही महिन्यांपूर्वी सबा कॉलनीत घर घेतले होते. ज्यामध्ये तो आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. लग्न 29 जून रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील देवयानी मनोहर बावणे हिच्यासोबत वणी येथील जगन्नाथ महाराज देवस्थानात सामाजिक रितीरिवाजानुसार पार पडला. लग्नानंतर अवघ्या 4-5 दिवसांनी देवयानी आपल्या माहेरी गेली होती, असे सांगितले जाते. गुरुवारीच देवयानीचे आई-वडील, बहीण आणि भाटव्याने तिला वणी येथे तिच्या सासरच्या घरी आणून सोडले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी नीरज आणि आपल्या कामावर निघून गेला. त्यावेळी नीरजचे वडील आणि आजारी आई घरी होते. सासू आणि सासऱ्यांसोबत सकाळचे जेवण करून देवयानी वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी नीरजच्या आईला वरच्या खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. सर्वांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता देवयानीची खोली आतून बंद होती. आरडाओरडा करूनही देवयानीने दार उघडले नाही तेव्हा शेजारच्या एका मुलाने लोखंडी सब्बलने दरवाजा उचकटून आत डोकावले तर देवयानी पंख्याला लटकलेली दिसली. घटनेची माहिती मिळताच देवयानीचा पती नीरज घरी पोहोचला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पंख्यावरून उतरवून पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
घटनेची माहिती दिल्यानंतर मृत देवयानीचे आई-वडील व इतर नातेवाईकही रात्री वणीत पोहोचले. शनिवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत महिलेने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.
हातावरची मेहंदी सुकण्यापूर्वीच तीने मृत्यूला कवटाळले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2024
Rating: