मॅकरून स्टुडंट अकॅडमी स्कुलची यशस्वी घोडदौड: यंदाही 100 टक्के निकाल


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSC) वतीने घेण्यात आलेल्या 10 वी व 12 वीच्या परीक्षेचा निकाल काल 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. एकूण 93.6 टक्के एवढा निकाल लागला असून 20 लाख 95 हजार 467 विद्यार्थी 10 वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

वणी शहरातील मॅकरून स्टुडंट अकॅडमी स्कुलने आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली असून शाळेने 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही अबाधित राखली आहे. या शाळेने 100 टक्के निकाल देण्याची परंपरा अखंडित ठेवली आहे. या शाळेतून 47 विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी ची परीक्षा दिली होती. यात शाळेचा 100 टक्के निकाल लागला असून, विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केलं आहे. शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षणासाठी मॅकरून शाळा ओळखली जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांचं विद्यार्थ्यांना नेहमीच योग्य मार्गदर्शन मिळत असून या शाळेतून आजतागायत सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडले आहेत. त्यामुळे 100 टक्के निकालाचे श्रेय प्रामुख्याने मुख्याध्यापिका व शिक्षकांना जातं. यातील काही विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीतही झळकले आहेत. काल जाहिर झालेल्या निकालामध्ये सनया महेंद्र कठाने या विद्यार्थिनीने 89 टक्के गुण घेऊन शाळेतून पहिल्या क्रमांकाचा मान मिळविला आहे. तर विजेता विश्वास शेळकी (88 टक्के) ही विद्यार्थिनी शाळेतून दुसरी आली आहे. तसेच तनिषा शैलेंद्र लाल (87 टक्के) व गौरव रमेश ढुमणे (87 टक्के) हे दोनही विद्यार्थी शाळेतून तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर सारांश नितीन खुशवाहा (86 टक्के), अपूर्वा विजय पावडे (83 टक्के), तन्वी सुनिल आसुटकर (82 टक्के), प्रतिक्षा प्रशांत चंदनखेडे (81 टक्के), समीक्षा जगदीश मोहितकर (80 टक्के), विदिशा राजेश भगत (79 टक्के), तनिषा बापूराव सरवर (76 टक्के), वैभव अरुण डोंगे (76 टक्के) हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या शाळेतून 10 वीत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका व शिक्षकांनी त्यांच्या उज्वल भाविष्याकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

यावर्षीही मुलींनीच बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 2 टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून येत आहे.
Previous Post Next Post