दुकानाला भीषण आग, 10 लाखाचे नुकसान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील पंचशील नगर येथे एका दुकानाला भिषण आग लागली. ही घटना रात्री 11.45 वाजताच्या सुमारास ही घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर दुकान व दुकानातील सुमारे 5 ते 10 लाखांचा माल जळून खाक झाला. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे.

पंचशील नगर येथील रहिवासी शाहबाज अहेमद
यांचे घराशेजारीच नसिम टेक्सटाईल्स नामक कपड्याचे रिटेल आणि होलसेलचे दुकान आहे. बेडशीट, चादर, ब्लॅकेट, सोफा कव्हर यासह जिन्स, टिशर्ट इत्यादी कपडे विक्रीचा व्यवसाय ते करतात. काल रात्री 11:45 वाजताच्या सुमारास अचानक दुकानाने पेट घेतल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. सजग नागरिकांनी लगेच फोन करून दुकानाला आग लागल्याची माहिती फायर ब्रिगेडला दिली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते, आगीची माहिती मिळताच पोलीस दल देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. आग लागल्याचे कळताच परिसरातील शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाणी आणून मदत केली. अखेर दीड ते दोन तासांनी आग विझवण्यात यश आले. परंतु या आगीत शाहबाज यांचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले.

या दुकानात सुमारे 5 ते 10 लाखांचा माल असल्याची माहिती शाहबाज यांनी दिली माहिती मिळताच फायर ब्रिगेड तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आग आजूबाजूच्या घरात पसरली नाही त्यामुळे मोठा धोका टळला. फायर ब्रिगेड चालक देविदास जाधव, फायर फायटर सौरभ पानघाटे, फायर फायटर दिपक वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली.