शहरांतील सर्व पाट्या मराठीत कराव्या, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडणार

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : राज्यातील प्रत्येक दुकानांवर मराठी पाट्या असल्याचं पाहिजे,यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचा मोठा संघर्ष सुरु होता. आणि आजही ते यासाठी आक्रमक आहेत. कोर्टाने मराठी पाट्या लावण्याची २५ पर्यंतची मुदत दिली होती. परंतु शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनामध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम १९४८ अन्वये बंधनकारक आहे. असं असताना देखील वणी शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनांवर कोणती ही कार्यवाही नगर परिषद कडून होताना दिसत नसल्याचाही आरोप मनसेकडून करण्यात आला. शहराध्यक्ष शिवराज पेचे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांना निवेदन देऊन शहरांतील मराठी व्यतिरिक्त इतर भाषांच्या पाट्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली.
मनसेने आधीपासूनच मराठी पाट्या लावण्याबद्दल राज्यात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामध्ये कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतर देखील काही दुकानांवर इंग्रजी पाट्या अजून ही दिसत असल्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या दोन दिवसात करण्याचा अल्टीमेटम देत, तर न्यायालयाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करुन शहरांतील सर्व पाट्या मराठीत कराव्या अन्यथा या मुद्द्याला घेऊन मनसेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
या वेळी मनसेचे गितेश वैद्य, लक्की सोमकुंवर, हिमांशू बोहरा, सचिन जाधव, वैभव पुरानकर, संस्कार तेलतुंबडे, कुणाल सोमशेट्टीवार यांच्या सह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.