सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी तपासणी व योग्य उपचार घेतानाच नियमित कालावधीत सोनोग्राफी देखील करण्यात आली. तरीही अघटितच घडले. तज्ज्ञ डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर गर्भातिल बाळ सुस्थितीत असल्याचे निदान दिले होते. पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याची शारीरिक अवस्था फारच दयनीय होती. अविकसित व विचित्र शारीरिक अवयव असलेलं बाळ जन्माला आलं. त्या बाळाची शारीरिक अवस्था पाहून जन्मदात्यांनाही अश्रू अनावर झाले. सोनोग्राफीत बाळ निरोगी असल्याचे प्रमाण देणाऱ्या डॉक्टरांना पालकांनी नवजात बाळाची अवस्था सांगितल्यानंतर डॉक्टारांनी घुमजाव केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
नरेंद्र शंकर बुजाडे यांची पत्नी भाग्यश्री ही गरोधर राहिल्याने त्यांनी नियमित तपासणी व उपचार घेणे सुरु केले. त्यांनी शहरातील तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्रावर सोनोग्राफी करून घेतली. गर्भवाढी नुसार सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टारांनी पोटातील बाळ सुखरूप असल्याचे निदान दिले. मात्र वेळोवेळी तपासणी, योग्य उपचार व सोनोग्राफी केल्यानंतरही अविकसित बाळ जन्माला आलं. विचित्र शारीरिक अवयव असलेलं मुल जन्माला आल्याने जन्मदाते चांगलेच दुखावले. सोनोग्राफीत निदान देतांना गर्भातील बाळ निरोगी व स्वस्थ होते, मग जन्माला आलेलं बाळ अविकसित व विकलांग कसं, या विवंचनेत त्यांनी डॉक्टरांशी संपर्क केला असता डॉक्टरांनी घुमजाव केले. उलट त्यांनी कुटुंबीयांनाच तंबी दिली असे उपोषण कर्ते म्हणणं आहे.
बाळाची अवस्था अतिशय नाजूक असल्याने आई वडिलांनी नागपूर येथे त्याच्यावर उपचार केले. पण काही उपयोग झाला नाही. एका महिन्याच्या कालावधीतच बाळ दगावलं. बाळ दगावल्याने नातेवाईक चांगलेच संतप्त झाले. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. डॉक्टरांवर कार्यवाही होत नसल्याचे पाहून त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. सहा दिवसांपासून त्यांचं न्यायासाठी उपोषण सुरु आहे. पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. उपोषण मंडपातील महिला आज चक्कर येऊन बेशुद्ध झाली. पण पाषाण व्ह्रदयी प्रशासनाला मात्र पाझर फुटला नाही.
डॉ. महेंद्र लोढा यांनी बुजाडे कुटुंबियांवर खंडणी मागितल्याचा ऑडिओ क्लिप केल्या समाजमाध्यमावर सार्वजनिक
डॉ लोढा यांनी मोबाईल वरील संभाषणाची ऑडियो क्लिप समाजमाध्यमावर सार्वजनिक केल्या आहे. बुजाडे कुटुंबीयांनी 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत तशी त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. परंतु बुजाडे कुटुंबीयांनी कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. आमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने खंडणी मागितली नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ऑडियो क्लिप मधील आवाजाची शहानिशा करून गुन्हे दाखल करायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
ऑडियो क्लिप मधील आवाज कुणाचा, याची आधी पडताळणी करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया बुजाडे कुटुंबातील व्यक्तीनी व्यक्त केली आहे. डॉ. लोढा यांनी याआधीही तत्कालीन पोलिस निरीक्षकांवर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. पण ते सिद्ध करू शकले नाही. त्यांच्यावर गर्भपाताचा आरोप झाल्याचे देखील ऐकायला मिळाले. मग नेमके त्यांच्या सोबतच असे प्रसंग का घडतात, हा प्रश्न उपोषणकर्त्या कुटुंबाने उपस्थित केला आहे. ते पोलिस निरीक्षकांवरच खंडणी मागितल्याचा आरोप करू शकतात, मग आम्ही तर सामान्य लोक आहोत. ते त्यांच्या विरुद्ध उठणारा आवाज दाबण्याकरिता कुठलीही शक्कल लढऊ शकतात, ही उपरोधक प्रतिक्रिया देखील उपोषण कर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणार असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
आमदार बोदकूरवार आणि चौकशी समितीचे आश्वासन
उपोषण मंडपातील महिला काल चक्कर येऊन बेशुद्ध झाली. ही बाब लोकप्रतिनिधीला समजताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, यवतमाळ सिव्हील सर्जन राठोड व टी एच ओ शेंडे यांनी भेट देत उपोषणकर्त्याची भेट घेत चर्चा करून आश्वासन दिले, यात असं म्हटले की, डॉ. लोढा यांच्याबद्दल चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येइल. दरम्यान, उपोषणकर्त्याना पेयजल पाजून त्यांचे आमरण उपोषण सोडले. मात्र, न्याय न मिळाल्यास यापुढेही हा लढा सुरूच राहील असेही उपोषणकर्त्यानी प्रतिक्रिया व्यक्त करित उपोषण मागे घेतलं.