"त्या" अज्ञात इसमाच्या खूनाची कबुली : 2 तरुणांसह एका महिलेला अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील नव्याने बांधण्यात आलेल्या महसुल भवन जवळ (ता.21ऑगस्ट) ला संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी काही तासांतच छडा लावला असून सदर इसमाचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनोळखी इसमाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असले तरी, त्या अनोळखी व्यक्ती चे नाव व त्याचा मूळ पत्ता शोधण्यात मात्र, पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

त्या अज्ञात इसमाची हत्या केल्या प्रकरणी 2 युवकांसह 1 महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे. अनिकेत दादाराव कुमरे (21) रा. सिंधी ता. मारेगाव, मारोती लक्ष्मण कुळमेथे (34) गणेशपूर, रोशनी कांचन भगत (25) रा. पंचशील नगर राजूर (कॉ),असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरातील महसूल भवन जवळ एका 45 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सोमवार दि.21 ऑगस्ट ला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास महसूल भवन जवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या शरीरावर विविध जखमा आढळल्याने तत्काळ मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. शवविच्छेदन अहवालात सदर इसमाला जबर मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवून काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींनी सदर इसमाला डोक्यावर, छातीवर व पोटावर मारून हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी अनिकेत कुमरे, मारोती कुळमेथे व रोशनी भगत यांच्यावर भादंवि च्या कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्या अज्ञात व्यक्तीचे ठावठिकाण शोधण्यात पोलिसांना अद्याप तरी यश आलेले नाही. 

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, सपोनि राजेश पुरी, माया चाटसे, माधव शिंदे, सपोउपनि सुदर्शन वानोळे, दिगांबर किनाके, सुहास मंदावार, पंकज उंबरकर, वसीम शेख, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे यांनी केली.