जड वाहतुकीमुळे नांदेपेरा-मजरा रस्त्याची दुर्दशा


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुक्यातील नांदेपेरा मार्गांवर जड वाहनामधून होणाऱ्या कोळसा, रेती, सिमेंट च्या वाहतुकीमुळे नांदेपेरा, मजरा ते वांजरी मार्गाची अक्षरशः दुर्दशा झाली असून नांदेपेरा ते मजरा रस्त्याची चाळण झाल्याचे दिसून येईल तर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे परिसरातील जनतेला प्रवास करणे कठीण झालेले आहे.

या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असून, एखादा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही असे प्रवाशी बोलून जातात. रस्त्यावरील धुळीमुळे प्रदूषण वाढले असून याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर आणि शेत पिकावर सुद्धा होत आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असला तरी खाणीचे कोळशाचे ट्रक, रेती घाटाचे ट्रक, सिमेंट ट्रकने यावरून नियम पायदळी तुडवून सर्रास जड वाहतूक करून दुर्दशा केली आहे. त्यामुळे नांदेपेरा, मजरा जवळील रस्त्याची झालेली चाळण पाहता हे कोण गांभीर्याने घेईल याकडे परिसरातील जनतेच्या नजरा लागल्या आहे.