सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१२ ऑक्टो.) : जुन्या वैमनस्यातून सलून व्यावसायिकाला दगड मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील सावर्ला येथे काल ११ ऑक्टोबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सलूनमध्ये ग्राहकाशी वाद घालणाऱ्या इसमाला हटकल्याचा राग मनात धरून त्याने व्यावसायिकाचे दगड मारून डोके फोडले. याबाबत सलून व्यावसायिकाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील सावर्ला येथे राहणाऱ्या व सलून व्यावसायिक असलेल्या संतोष अजाबराव दहिवलकर (३७) याने गावातच रहाणाऱ्या संतोष पुंडलिक तुराणकर (४०) याला काही दिवसांआधी सलून मध्ये दारू पिऊन ग्राहकाशी वाद घालण्यावरून हटकले. त्याच्या राग मंदिर धरून संतोष तुराणकर याने काल गावातील पान ठेल्यावर मित्र व भावासोबत बसून असलेल्या संतोष दहिवलकर याच्याशी विनाकारण वाद घालून त्याच्या डोक्यावर दगड मारून जखमी केले. जोरात फेकून मारलेला दगड डोक्यावर लागल्याने संतोष दहिवलकर याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. याबाबत त्याने पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी संतोष तुराणकर याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.