बेपत्ता तरुणाचा अखेर मृतदेहच आढळला

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१२ ऑक्टो.) : तिन दिवसांपूर्वी घरून बेपत्ता झालेल्या युवकाचा अखेर मृतदेहच आढळून आला. शेतातील नालीच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. वडिलांना फिरायला जातो म्हणून घरून बाहेर पडलेला युवक दिवस लोटूनही घरी न परतल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविण्यात आली होती. आज १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता त्याचा एका शेतातील नालीच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. 

शहरातील तेलीफैल येथे राहणारा मोरेश्वर गणपत देवाळकर (३३) हा तरुण नेहमी मद्य प्राशन करायचा. मद्याची त्याला सवयच जडली असल्याचे कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा युवक ९ ऑक्टोबरला सकाळी ७.३० वाजता वडिलांना फिरायला जातो म्हणून घरून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. तो घरून बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. आज सकाळी ११ वाजता संजय पोटदुखे यांच्या शेतातील नालीच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे वडील सेवानिवृत्त वेकोलि कर्मचारी असून त्याला दोन भावंडे आहेत. त्याच्या या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.