Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा तलाव परिसर सौंदर्यीकरणासाठी २० कोटींचा निधी द्या


                                               (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
चंद्रपूर, (१५ जुलै) : जिल्ह्यातील असोलामेंढा तलाव हा इंग्रजकालीन असून ११४ वर्ष जुना आहे. या परिसरात देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याने या परिसराच्या विकासासाठी किमान २० कोटी निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा येथील परिसराच्या सौंदर्यीकरणाबाबत मंत्री वडेट्टीवार यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, आर्किटेक्ट भिवागडे यांच्यासह या विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी असोलामेंढा तलाव परिसरातील सौंदर्यीकरण करण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, असोलामेंढा तलाव हा जंगलव्याप्त परिसर असून तलाव आणि परिसर हे जलसंपदा विभागाकडे येत असून परिसरातील जागा जलसंपदा विभागाची आहे. या परिसराला देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. मात्र पर्यटकांच्या दृष्टीने या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून साहसी पर्यटन सुविधा दिल्या तर पर्यटनात वाढ होईल. त्याचबरोबर स्थानिक रोजगारसुद्धा वाढेल. त्याकरीता किमान २० कोटींचा निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, असोलामेंढा तलाव क्षेत्रातील पर्यटन क्षेत्र विकासाबाबत विभागामार्फत आपण निश्चित निर्णय घेऊ व त्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. तलाव परिसरातील सौंदर्यीकरण जर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत करावयाचे झाल्यास ही जागा जलसंपदा विभागामार्फत एमटीडीसीकडे हस्तांतरित करावी लागेल. त्याचबरोबर स्थानिक क्षेत्रात हॉटेल व्यवसायिकांशी प्राथमिक चर्चा करून सार्वजनिक-खाजगी सहभागातून त्यांनाही यामध्ये संधी देता येते, का याची पाहणी करण्याचे आश्वासन यावेळी पर्यटन मंत्र्यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post