सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (३१ जुलै) : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरड (पुरड) येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज ३० जुलैला उघडकीस आली. प्रदिप रामदास कौकमवार (२६) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. २९ जुलैला तो कुणालाही न सांगता घरून निघून गेला. कुटुंबीय व नातेवाईक त्याचा शोध घेत होते. दरम्यान नातेवाईकांना तो पहाटे त्याच्याच शेतात निपचित पडून दिसला. शेतात फवारणी करणारे किटकनाशक त्याने प्राशन केले होते. त्याला तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूरला रेफर केले. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. प्रदिप कौकमवार हा अल्प भूधारक शेतकरी होता. त्याच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती असल्याचे समजते. शेतीतीलच उत्पादनावर त्याच्या कुटुंबाचा गाडा चालायचा. कुटुंबाचा तो एकमेव आधार होता. काही वर्षाआधी वेकोलीने कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाकरिता त्याचे शेत राखीव केल्याचे समजते. पण वेकोलिने शेत जमीन संपादित न केल्याने ते प्रदिप कौकमवार याच्याच ताब्यात होते. तोच शेत जमिनीवर वहती करीत होता. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याने एकाएक आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षाआधी त्याच्या वडिलानेही विषारी द्रव्य प्राशन करूनच आत्महत्या केली होती. प्रदिप कौकमवार २९ जुलैला अचानक घरून बेपत्ता झाला. त्यानंतर ३० जुलैला पहाटे त्याच्याच शेतात तो निपचित पडून दिसला. त्याने किटकनाशक प्राशन केल्याचे दिसून येताच त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या प्रदीप कौकमवार याने आत्महत्ये सारखा पर्याय निवडल्याने कुटुंब चांगलेच हादरले आहे. त्याच्या मागे पत्नी, आई व दोन बहिणी असा आप्त परिवार आहे. त्याच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.