सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२५ जुलै) : शहरातील मटण मार्केट हे मागील कित्येक वर्षांपासून जत्रा मैदान येथे खुल्या जागेवर भरत असून अजूनही या मटण मार्केटला स्थायी व हक्काची जागा देण्यात आलेली नाही. उघड्यावर मटण विक्री केली जात असून मास व घाण लगतच्याच खुल्या जागेत टाकण्यात येत असल्याने याठिकाणी नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. मांस व घाणीच्या दुर्गंधीमुळे आसपासच्या परिसरातील जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. मटणाचा निष्क्रिय भाग व घाण रस्त्यालगतच टाकण्यात येत असल्याने त्यावर डुकरं व कुत्रे ताव मारत असतात. त्यामुळे या परिसरात डुकरं व कुत्र्यांचा वावर चांगलाच वाढला आहे. वणी घुग्गुस मार्गावरून दीपक चौपाटीला जोडणारा डीबी रोड तयार करण्यात आला असून याच रस्त्यावर मटण विक्रीची दुकाने थाटली जात असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. मटण मार्केट करीता नगर पालिकेने स्थायी व हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मागील कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. पण नगरपालिका याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे.मटण विक्रेत्यांकडे अद्यापही जुनीच हात वजनं असून हात वजनांनी मटणाचे वजन करतांना विक्रेते हात चालाखी करीत असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांमधून ऐकायला मिळत आहे. हातवजनाने मटणाचे वजन करतांना अलगद दांडी मारली जात असल्याची ओरड ग्राहकांमधून होत आहे. एकाही मटण विक्रेत्याकडे इलेक्ट्रॉनिक वजन नसून तशा सूचनाही त्यांना संबंधित विभागाकडून देण्यात आलेल्या नाहीत. छोट्यातल्या छोट्या दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन पद्धतीने वजन केले जात असतांना मटण विक्रीचीच दुकाने याला अपवाद का, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. भाजी विक्रेत्यांकडेही इलेक्ट्रॉनिक वजनं आली आहेत. मग मटण विक्रेत्यांनीच हातवजनं का कवटाळून ठेवली, हेच कळत नाही. वजनात हातचलाखी करून एका किलो मागे १०० ते २०० ग्राम पर्यंत दांडी मारल्या जात असल्याचे अनेक ग्राहकांना अनुभव आले आहेत. नजर हटी, दुर्घटना घटी हा प्रकार मटण विक्रीच्या दुकानांमध्ये सुरु आहे. आज ६०० रुपये किलो मटणाचा भाव आहे. एक किलो मटणाच्या वजनात १०० ते २०० ग्राम पर्यंतची दांडी मारली गेल्यास ग्राहकाचे किती नुकसान होऊ शकते याचा सहज अंदाज येतो. हातवजनाचं अस्त्र वापरून हातचलाखीचं सत्र सुरु ठेवण्याचा हा प्रकार आता थांबवायला हवा. मटण विक्रेत्यांनाही इलेक्ट्रॉनिक वजनांचा वापर करणं बंधनकारक करण्यात यावं, ही मागणी आता ग्राहकांमधून होऊ लागली आहे.
शहरातील मटण विक्रीच्या दुकानांमध्ये अजूनही हातवजनांनीच वजन होत आहे. इलेक्ट्रॉनिक वजनाचा वापर हेतुपुरस्सर टाळला जात आहे. संबंधित विभागानेही मटण विक्रेत्यांना इलेक्ट्रॉनिक वजन वापरणं बंधनकारक केलं नसल्याने आधुनिक काळातही जुन्याच वजन पद्धतीचा वापर सुरु असल्याचे दिसून येत आहे. आज भाजी विक्रीच्या दुकानांमध्येही इलेक्ट्रॉनिक वजनाचा वापर होत आहे. मग मटण विक्रेत्यांनी अद्यापही इलेक्ट्रॉनिक वजनाचा वापर का सुरु केला नाही, हे कळायलाच मार्ग नाही. संबंधित विभागाला इलेक्ट्रॉनिक वजनाची तपासणी सहज करता येते. पण हात वजनातून होणारी हातचलाखी रोखता येणं शक्य नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वजन वापरणं बंधनकारक करणं आवश्यक झालं आहे. मटणाच्या दुकानांमध्ये वजनात दांडी मारण्याचे प्रकार सुरु असल्याचे ग्राहकांमधून ऐकायला मिळत आहे. मटणाच्या वाढत्या किमती लक्षात घेता वजनातील हातचलाखीमुळे ग्राहकांचं मोठं नुकसान होत आहे. एका किलोमागे १०० ते २०० ग्रामचा गंडा घातल्या जात असल्याचे ग्राहकांचे अनुभव आहे. त्यामुळे मटण विक्रेत्यांनाही इलेक्ट्रॉनिक वजनाचा वापर करणं बंधनकारक करण्यात यावं, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.
मटण विक्रीच्या दुकानांमध्ये वजनात होते ग्राहकांची फसगत, एकाही विक्रेत्याकडे इलेक्ट्रॉनिक वजन नाही
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 25, 2021
Rating:
