युवकाचा तलावात बुडून मृत्यू


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
राळेगाव, (८ जुलै) : राळेगाव तालुक्यातील वडकी पो.स्टे अंतर्गत येत असलेल्या मंगी शेतशिवारातील एका युवकाचा डिंगडोह तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि. ७ जुलै रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दहेगाव येथील अजय गजानन तोडसाम (18) हा गावातील मुलासोबत मंगी शेतशिवारात असलेल्या डिंगडोह तलावात अंघोळ करण्याकरिता गेला होता, तलावात अंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज माहीत नसल्याने अजय तोडसाम हा खोल पाण्यात जाऊन गाळात फसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गावकऱ्यांना माहिती होताच तलावाकडे लोकांनी धाव घेतली. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती.
गावकऱ्यांनी तलावात अजयचा शोधाशोध केला असता, सुमारे दोन तासानंतर अजयचा मृतदेह हाती लागला. घटनास्थळी तात्काळ वडकी पो.स्टे. चे कर्मचारी रमेश आत्राम सह मेश्राम यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविण्यात आले. याप्रकणी पुढील तपास वडकी पो.स्टे. करीत आहे.