मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील सिमेंट रस्ते बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (ता.१६) : मारेगाव तालुक्यातील शिवनाळा ग्रामपंचायतेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून या आर्थिक हितसंबंधातून मिळालेल्या कंत्राटाची चौकशी करून निकृष्ठ दर्जाचे सिमेंट रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी गावातीलच सामाजिक कार्यकर्ते राहुल नारायण आत्राम यांनी राज्याचे मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री व ग्राम विकास मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. शिवनाळा हे आदिवासी बहुल गाव असून या गावातील रहिवाशांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन ग्रामपंचायत मनमानी कारभार करीत आहे. शिवनाळा ग्रामपंचायतेच्या वार्ड क्रं. १ व ३ मध्ये ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्यांचे बांधकाम अतिशय निकृष्ठ दर्जाचे असून हे बांधकाम थांबविण्याकरिता रवींद्र आत्राम यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. पण त्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच तक्रारीचे निवेदन पाठविले आहे. 
मारेगाव तालुक्यातील शिवनाळा ग्रामपंचायतेंतर्गत वार्ड क्रं. १ व ३ मध्ये सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. ठक्कर बाप्पा योजनेमधून सदर रस्त्यांचे बांधकाम केले गेले. सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाची ई निविदा न काढता विद्यमान ग्राम सचिवालाच संगम मताने बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. रस्ते बांधकामाचा जराही अनुभव नसलेल्या ग्राम सचिवाला आर्थिक देवाणघेवाणीतून कंत्राट दिल्या गेले. बांधकाम क्षेत्रातील अनुभवी व सुशिक्षित कंत्राटदारांना कंत्राट मिळण्यापासून दूर ठेवल्या गेले. हा बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदारांवर झालेला एकप्रकारचा अन्याय आहे. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करतांना अतिशय कमी प्रतीचे मटेरियल वापरण्यात आले आहे. सिमेंटमध्ये रेती ऐवजी चुरी वापरण्यात आली आहे. चुरीमिश्रित गिट्टी व माती मिश्रित रेती वापरून रस्ते तयार करण्यात आले आहे. रस्त्यांचा दर्जा अतिशय खालावलेला असून निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या एकाच पावसात या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. रस्त्यांचे बांधकाम शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात करण्यात आलेले नाही. रस्त्यांची जाडी ४ इंच न ठेवता २ ते अडीच इंच ठेवण्यात आली आहे. रस्त्यावर काँक्रेट पसरविण्याकरिता व मटेरियलची दबाई करण्याकरिता व्हाईब्रेटर मशीनचा वापर न करता नुसतेच मटेरियल पसरविण्यात आले. त्यामुळे ते पावसाच्या पाण्यात टिकाव धरेल असे वाटत नाही. रस्ते बांधकामात लोह्याच्या सळाखी वापरण्यात आलेल्या नाही. सळाखी वापरण्याची काहीही आवश्यकता नसल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात आले. असे हे निकृष्ठ दर्जाचे सिमेंट रस्ते तयार करण्यात आले असून ग्रामपंचायत शासनाच्या निधीची उधळपट्टी करीत असल्याचे दिसून येत आहे. कोणताही अनुभव नसतांना ग्राम सचिवाने कंत्राट मिळविले. नंतर निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार करून बांधकामात भ्रष्टाचार केला. गाववासीयांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत ग्रामपंचायतेने रस्त्यांच्या बांधकामात आजवर मोठे घोळ केले आहे. रस्त्याच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कंत्राटदारासह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवनाळा येथील समाजसेवक राहुल आत्राम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.