टॉप बातम्या

सात दिवसांत तोडगा काढा, अन्यथा १३ नोव्हेंबरला चक्का जाम!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : तालुक्यातील सोमनाळा, निंबाळा ते चिखलगाव चौफुली परिसरासह राजूर रिंग रोडलगत सुरू असलेल्या कोल डेपो, कोल वॉशरी, डोलोमाईट कंपनी आणि रॅक पॉईंटमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर झाल्याचा आरोप बाधित नागरिकांनी केला आहे. तसेच, सातत्याने होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे राजूर रिंग रोडची दुरवस्था झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांवर सात दिवसांत बैठक घेऊन ठोस तोडगा काढावा, अन्यथा १३ नोव्हेंबर रोजी राजूर रिंग रोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लढा संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे यांनी दिला आहे.

या मागण्यांसंदर्भात उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा, सोनापूर, बोदाड, पळसोनी, मेघदूत, कळमना (लालपुलिया) आणि चिखलगाव परिसरातील कोल डेपो व कोल वॉशरीमुळे प्रदूषण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित विभागांकडून वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाच प्रमुख मागण्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी

मुख्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेले सर्व कोल डेपो बंद करावेत, राजूर रिंग रोडलगतचे कोल डेपो बंद करावेत आणि रुख्माई कोल वॉशरी, विकास कोल, रॅक पॉईंट व डोलोमाईटसाठी जिल्हा परिषद रस्त्यावरून होणारी ओव्हरलोड वाहतूक थांबवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच, कळमना ग्रामपंचायतीच्या आंदोलनानंतर संबंधित कोल वॉशरी व कोल डेपो धारकांकडून रस्त्याचे बांधकाम करून घेण्यात आलेल्या पद्धतीने राजूर रिंग रोडचे कामही तातडीने करून घ्यावे, अशी मागणी आहे.

गेल्या १५ ते २० वर्षांत संबंधित कोल वॉशरी, कोल डेपो, लाईमस्टोन व डोलोमाईट कंपन्यांकडून पर्यावरण आणि आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत की नाहीत, याची चौकशी करून संबंधितांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत लेखी उत्तर द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

यापूर्वी ७ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, वणी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कोल डेपो धारक व अधिकाऱ्यांची बैठक तसेच २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्याचा उल्लेख निवेदनात आहे. २१ ऑक्टोबर रोजीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. मात्र, प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाला सात दिवसांची मुदत

प्रदूषण, ओव्हरलोड वाहतूक आणि रस्त्याच्या दुरवस्थेच्या प्रश्नावर प्रशासनाने सात दिवसांत बैठक घेऊन निर्णय घ्यावा. अन्यथा १३ नोव्हेंबर रोजी राजूर रिंग रोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाधित नागरिकांनी दिला आहे.

या निवेदनावर लढा संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे, अॅड. रुपेश ठाकरे, राहुल क्षीरसागर, मंगेश येटे, पंकज मोरे, राहुल कुत्तरमारे, मनोज ढेंगळे, शिवाजी मोरे, इमामुल हुसेन, अतुल चांदेकर, भगवान मोहिते, धनंजय भोयर आणि रोशन गारपेलीवर यांच्यासह संबंधितांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();