सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील एकता नगरच्या प्रवेशद्वारावर प्रस्तावित सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम अन्यत्र हलवून शहरातील बंद व दुरवस्थेतील जुन्या सार्वजनिक शौचालयांची आधी दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. यासंदर्भात मुबीन पिरसाहेब शेख यांनी ३० ऑक्टोबर रोजी नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले.
एकता नगर परिसरात दाट लोकवस्ती असून, प्रस्तावित जागेवर शौचालय उभारल्यास नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे. शहरातील अनेक सार्वजनिक शौचालये बंद अवस्थेत असून, दिव्यांगांसाठीच्या स्वच्छतागृहांची सुविधाही उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नवीन बांधकाम करण्याऐवजी आधी जुन्या शौचालयांची दुरुस्ती करून ती नागरिकांसाठी सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन प्रस्तावित शौचालयाच्या जागेबाबत फेरविचार करावा आणि शहरातील बंद व दुर्लक्षित सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. मात्र, प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष करून प्रस्तावित ठिकाणी बांधकाम सुरू केल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी प्रहारचे जिल्हाउपाध्यक्ष मुबीन शेख, शहर अध्यक्ष अहमद सय्यद, शहर उपाध्यक्ष शेख खलील, सुधाकर बुरांडे, रजनीकांत बुरांडे, चेतन हस्तर, निकेश मेश्राम,शेख आदिल, शेख वासीम, शेख छोटू यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


