टॉप बातम्या

अनधिकृत एस. बी. लॉनला नगर परिषदेची नोटीस; वापर तात्काळ थांबविण्याचे निर्देश!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहराच्या मध्यवर्ती भागातील एस. बी. लॉन व हॉलच्या कथित अनधिकृत बांधकामाचा तसेच अग्निसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत वणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लॉनचे संचालक विजय बनवारीलाल अग्रवाल यांना कठोर नोटीस बजावली आहे. तसेच मंगल कार्यालयाचा वापर तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिल्याने या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी नगर परिषद व पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर करून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. लॉनमधील फायर एग्झिटसह सुरक्षाविषयक नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले होते. याप्रकरणी आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.

मनसेच्या तक्रारीनंतर नगर परिषद प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीत संबंधित लॉनच्या मालकाने मंजूर अभिन्यास नकाशा, बांधकाम परवानगी आणि मंजूर बांधकाम नकाशा नगर परिषदेकडे सादर केलेला नसल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ४४, ५२, ५३, ५४ तसेच महाराष्ट्र नगर परिषदा अधिनियमातील कलम १८९ (२) अन्वये परवानगीशिवाय विकासकाम केल्याप्रकरणी कारवाईची तरतूद असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित जागेवरील मंगल कार्यालयाचा (हॉल व लॉन) वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, नगर परिषदेच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून करण्यात आलेले कथित अनधिकृत बांधकाम तातडीने हटवावे आणि हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणीही मनसेने लावून धरली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन आता पुढे कोणती ठोस पावले उचलते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

"नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवितसुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर मनसे कोणतीही तडजोड करणार नाही. नगर परिषदेने वापर थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून लॉनचा वापर सुरू ठेवल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी दिला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();