टॉप बातम्या

गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्रीचा बाजार; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

मारेगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव शहरातील फटाका विक्रीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. शहरातील सामाजिक बाजारपेठ, मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून फटाक्यांची दुकाने थाटण्यात आल्याचा आरोप होत आहे. गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे फटाक्यांची विक्री सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित अनधिकृत विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.

याप्रकरणी सूरज प्रकाश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. फटाका विक्रीसाठी आवश्यक परवाने, सुरक्षित अंतराचे निकष, अग्निसुरक्षेच्या उपाययोजना तसेच शासनाने निर्धारित केलेल्या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, याची सखोल तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मारेगाव पोलीस ठाण्यासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने फटाका विक्रीच्या ठिकाणांची तपासणी, परवान्यांची पडताळणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत निर्देश दिल्याचे संबंधित पत्रातून समोर आले आहे.

निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी फटाका विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, विनापरवाना दुकाने बंद करावीत आणि गर्दीच्या परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

मात्र, केवळ पत्रव्यवहार आणि आदेश देण्यापुरतीच प्रशासनाची भूमिका मर्यादित राहणार की प्रत्यक्ष मैदानात उतरून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या विषयाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याकडे आता मारेगावकरांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();