सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील प्रभाग क्रमांक १३ मधील २० वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आचल अभिजित मांडवकर असे मृत महिलेचे नाव आहे.
६ ऑगस्ट रोजी आचल हिने राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.
गेल्या पाच दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.तिच्या या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आचलच्या पश्चात पती, सासू आणि अवघी ११ महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.

