सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पोलिसांनी मंदर येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करत तो जप्त केला आहे. तसेच, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ५ ऑगस्ट, २०२५ रोजी ००:१५ वाजता करण्यात आली.
पोलिस हवालदार सचिन मरकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की मंदर येथे अवैध रेती वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल श्रीनिवास गोंलावर यांच्यासह मंदर येथे जाऊन पाहणी केली.
यावेळी MH 29 CB 7742 क्रमांकाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिनेश नानाजी गुहे (वय ३१, रा. मंदर, ता. वणी) असल्याचे सांगितले.
पोलिसांनी ट्रॅक्टरची तपासणी केली असता, त्यात अंदाजे १ ब्रास रेती (किंमत ७ हजार रुपये) आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि ७ हजार रुपयांची रेती असा एकूण ४ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चालक दिनेश गुहे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, कलम ३०३ (२) सह जमीन महसूल कायदा, कलम ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन वणी यांच्या आदेशानुसार पोलिस हवालदार सचिन मरकाम आणि पोलिस कॉन्स्टेबल श्रीनिवास गोंलावार यांनी केली.