सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
एकदा मी माझ्या सखीला फोन केला.
मी: “सखी, कसं वाटलं गं… स्वर्गाच्या दारात जाऊन?”
सखी: “अगं, खूप छान वाटलं… स्वर्गाचे दार म्हणे!”
मी: “अगं, एवढी कसली घाई झाली तुला स्वर्गात जायची? अजून बरंच काही करायचं आहे आपल्याला या जन्मात!”
सखी: “हो गं, पण स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचणं काही सोपं नसतं. आपण आपल्या तब्येतीचा विचार कमी करतो, आणि घरच्यांचा व घरातील कामांचा विचार जास्त करतो. घरकाम करता करता स्वतःकडे लक्ष देणं आपण विसरतो.”
मी: “तुझं वय काय? फक्त ४०-४१! या वयात अँजिओप्लास्टी व्हावी म्हणजे तू स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नाहीस! तीन महिन्यांपूर्वी तू बीपीच्या गोळ्या बंद केल्याचं मला आठवतंय, तेही डॉक्टरांचा सल्ला न घेता. बरोबर ना?”
सखी: “हो गं, खरं आहे.”
मी: “मग तेच मुख्य कारण झाले . पहिलं—गोळ्या बंद करणं, दुसरं—शरीराच्या सूचना दुर्लक्षित करणं. अटॅक येण्याच्या आधी महिना भर शरीर इशारे देत होतं—सतत घाम येणं, अस्वस्थ वाटणं, थकवा… पण आपण काय करतो? ‘वय कमी आहे, काही होणार नाही’ असं समजून दुर्लक्ष करतो.”
सखी: “हो गं, मला जाणवत होतं काहीतरी गडबड आहे, पण मी दुर्लक्ष केलं. ‘आजारपणाचं काय घेऊन बसायचं? काम करत राहिलं की सगळं निट होतं’ — हा विचार मनात होता.”
मी: “अगं, आपण निट नसू तर घरदार निट राहणार कसं? आपण आजारी पडलो की आपल्या बरोबर घरच्यांचेही हाल होतात. दुसऱ्यांसाठी आपण जीव ओतून काम करतो, मग एक गोष्ट तरी स्वतःसाठी का करू नये?
रोज थोडं चालणं, साधा प्राणायाम, हलका योग, ध्यान… फार वेळ नको, पण सवय हवी. आळस, टाळाटाळ करून नंतर दवाखान्यात पैसा घालवण्यापेक्षा ही थोडी कसरत चांगली नाही का?”
सखी: “बरोबर आहे गं. नाहीतर आपल्या आळशीपणामुळे आपण दवाखान्यात पैसा घालवतो आणि आयुष्यभराची कमाई खर्च करतो. काही अनुभव विकत घ्यावे लागतात तेव्हाच आपल्यात बदल होतात.”
मी: “बस, हेच लक्षात ठेव. अजून वेळ गेलेली नाही. आता स्वतःकडे लक्ष दे, आणि तुझ्या बरोबर घरच्यांचंही आरोग्य जप. देवाने हा अनुभव देऊन तुला इशारा दिला आहे. आता नव्या जोमानं सुरुवात कर—आरोग्य नसेल तर घर, संसार, सगळंच विस्कळीत होतं.”
टिप :- हे माझ्याच सखी विषयी नाही तर सगळ्यांच सखी आणी सख्यांंन विषयी आहे.चार गोष्टी दुसऱ्यांसाठी करताना एक गोष्ट तरी आपल्या साठी करावी याला स्वार्थीपणा नाही म्हणता येणार.