Top News

ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांनी पुरस्कारांचे ओलांडले शतक!!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

लातूर : साहित्याच्या साधारण सर्व प्रकारात लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक, वात्रटिकाकार , कवी श्री भारत सातपुते यांनी पुरस्कारांचे नुकतेच शतक ओलांडले आहे.
लातूर तालुक्यातील गातेगावचे सुपुत्र भारत सातपुते यांनी चाळीस वर्षांपूर्वी आपल्या लेखनाला कवितांच्या माध्यमातून सुरुवात केली.1985 साली 'जगणं माणसाचं' हा पहिला काव्यसंग्रह नाशिकच्या दवबिंदू प्रकाशनाने प्रकाशित केला. आता वयाची त्रेसष्टी पार करताना भारत सातपुते यांची संख्यात्मक दृष्टीने पाच डझन पुस्तके प्रकाशित झाले आहेत. ज्यामध्ये 12 काव्यसंग्रह, 10 वात्रटीकासंग्रह ,8 कथासंग्रह, 6 बालसाहित्य, 6 व्यक्तीचरित्र व इतर 8 साहित्यात नाटिका, शैक्षणिक, वैचारिक, ऑडिओ कॅसेट प्रसिद्ध झाले आहे. तर भारत सातपुते यांच्या शैक्षणिक व साहित्यिक प्रवासावर  6 पुस्तके लिहिली असून ज्यात शिक्षण क्षेत्रातील सिंघम, पुरचुंडी,मुलाखत एका साहित्यिकाची , भारतनामा,तसेच सातपुते यांच्या निवडक कविता, निवडक वात्रटीका, निवडक कथा यांचेही द्या टाळी ,तळमळ, अवं कवातरी चांदणं दिसल या नावाने विविध लेखकांनी संपादित केलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भारत सातपुते यांच्या अनेक मराठी कवितांचा इंग्रजी व हिंदी भाषेत अनुवादही झालेला आहे. पंधरा वर्षांपूर्वी मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या पुण्याच्या 'यशदा' तर्फे 'विद्या आली दारोदारी' हा लघुचित्रपटही प्रदर्शित झाला असून या चित्रपटात भारत सातपुते यांची कथा व गाणी आहेत.

भारत सातपुते यांच्या शैक्षणीक व या वांग्मयीन प्रवासाबद्दल त्यांना राज्य व केंद्र शासनासह  अनेक सेवाभावी, सामाजिक व साहित्यिक संस्थांकडून सतत सन्मान होत असून नुकतेच त्यांनी पुरस्कारांचे शतक ओलांडले आहे. मिळालेल्या पुरस्कारांत मराठवाडा 35, विदर्भ 8, पुणे-मुंबई 13, पश्चिम महाराष्ट्र कोकण 15 , तर परराज्यातून म्हणजे दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक इथूनही मिळालेल्या पुरस्कारांसह एकुण संख्या आता 100 पेक्षा जास्त झाली आहे. यात शैक्षणिक कामाबद्दल 25 तर उर्वरित साहित्यिक कार्याबद्दल पुरस्कार लाभले आहेत. या पुरस्कारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जीवनगौरव पुरस्कारांचाही समावेश आहे. वाङ्मयाच्या विविध प्रकारात पुरस्कारांच्या स्पर्धेत आलेल्या शेकडो प्रस्तावातून दोघा तिघांच्या निवड समितीने हे पुरस्कार निवडलेले असतात ज्यात भूकंपानंतरची मने, कोपरखळी, अंधार वाढताना, चेहरा, डॉ. कलाम, मांजराकाठ, नावं कशाला बदनाम करता?, इरस, शाळा माझी छान, सांग ना ग आई, आता बोंबला, चेहरा, शिकाळं, छोट्यांच्या मोठ्या गोष्टी, खुलवर, हिरवं सपन, आम्ही फुले बोलतोत, आदी पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 

एक वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या जागरण या कादंबरीवजा आत्मचरित्रास तर जवळजवळ दोन डझन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या जागरणची तर सहावी आवृत्ती निघत आहे. जागरणचा हिंदी, इंग्रजी,  कन्नड भाषेत अनुवादही होत आहे. या  जागरणवर आजतागायत दोनशेपेक्षा जास्त समीक्षा प्राप्त असून त्यातील शंभरहून अधिक समीक्षा या राज्यातील व राज्याबाहेरील विविध दैनिक मासिक नियतकालिकांनी प्रसिद्ध झाल्या आहेत.

विविध प्रसार माध्यमावर सातपुते यांचे 88 कार्यक्रम झाले असून 26 प्रातिनिधिक पुस्तकांनी त्यांच्या कविता लेख प्रसिद्ध आहेत तर आज पर्यंत भारत सातपुते यांनी विविध लेखकांच्या 73 पुस्तकांना अभिप्राय, समीक्षा लिहिल्या आहेत. जिल्हा, विभागीय ते अखिल भारतीय पातळीवरील शेकडो कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन केले असून अनेक छोट्या-मोठ्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहेत. स्नेहसंमेलन, मेळावे, आदी कार्यक्रमात विविध विषयावर हजारो ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. साक्षरता व सर्व शिक्षा अभियानात समन्वयक , तर व्यसन, भ्रष्टाचार व कॉपी विरोधात संघर्षाची भूमिका व  सतत पाच वर्षे सुट्टीविना शाळा, विविध उपक्रमशील प्रयोग, पायाभूत ज्ञान पक्के करणे, वृक्षारोपण, स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य आहे. 

असाही योगायोग! ......
अकोला येथील अंकुर साहित्य संघाचा 1994 साली भारत सातपुते यांच्या 'हे तिरंगी झेंड्या' या काव्यसंग्रहाला साहित्य  क्षेत्रातील  पहिला पुरस्कार मिळाला होता. आता याच साहित्य संघाचा यावर्षी  'जागरण' या आत्मचरित्राला मिळालेला भारत सातपुते यांचा हा शंभरावा पुरस्कार हा योगायोगच म्हणावा लागेल. काही वेळा एकाच दिवशी दोन -दोन ठिकाणी पुरस्कारांचे कार्यक्रम आयोजित केल्याने  व तारखां न जुळल्याने काही कार्यक्रमाला पुरस्कार स्वीकारण्यासाठी भारत सातपुते उपस्थित राहू शकले नाहीत. तर पुणेच्या अ.भा. मराठी प्रकाशक संघचा बालवांग्मय पुरस्कार, नेवासा-नगर येथील शिवराज्य बहुउद्देशीय संस्थेचा जीवनगौरवसह इतर जाहीर झालेल्या पुरस्कारांचे कार्यक्रमही आणखी संपन्न होणार आहेत. परदेशातीलही काही साहित्य संस्थांनी भारत सातपुते यांच्या लिखाणाची दखल घेतली आहे.

अनेक पुरस्कार नाकारलेही!...
पुरस्कारांचे अमाप पीक पसरले हे खरे असून पुरस्कार हा धंदा झाला आहे. यात ज्यांनी ज्यांनी पुरस्कार जाहीर करून पैसे मागण्याचा प्रकार केला ते ते पुरस्कार भारत सातपुते यांनी नाकारले आहेत. काही नोंदणी केलेल्या विद्यापीठ धरतीवरील कॉमनवेल्थ सारख्या संस्था तर पैसे घेऊन डि.लीट.,पी.एचडी देतात, काही महाभाग वर्ल्ड पार्लमेंटरी अवार्ड देतात, तर काहीजण याच मार्गाने महारत्न पुरस्कार मिळवतात. असे किमान अर्धा डझन तरी पुरस्कार सातपुते यांनी नाकारले असून पंधरा वर्षांपूर्वी 'पुरस्काराच्या गमती जमती' हे सातपुते यांचे पुस्तक गाजले होते, तर अशात आलेल्या अनुभवावर 'पुरस्कार! का तिरस्कार?' हे त्यांचे लवकरच पुस्तक निघणार आहे. काही पुरस्कारांना रक्कम मिळाली नाही परंतु खिशातून पैसे द्यावे लागले नाहीत असे पुरस्कार स्वीकारल्याची कबुली सातपुते यांनी दिली आहे.
 
मसाप' ही 'साप'च!....
मसाप म्हणजे छत्रपती संभाजी नगर येथील मराठवाडा साहित्य परिषदेला मात्र भारत सातपुते यांच्या कोणत्याच साहित्याची कधी दखल  घ्यावी असे वाटले नाही. गेल्या वर्षभरात जागरणवर देशभरातील शेकडो मराठी दैनिक, मासिक व नियतकालिकातून समिक्षा  प्रसिद्ध झालेल्या असून या मसापच्या 'प्रतिष्ठान' मधून मात्र जागरणवरच काय पण इतर सातपुते यांच्या कोणत्याही पुस्तकावर कधीही एक ओळही छापून आली नाही, तसे तर गेल्या दहा-बारा वर्षात 'प्रतिष्ठान' हे सभासदांना बघायलाही मिळत नाही. 

मराठवाड्यातल्या अनेक नामवंतांनी प्रतिष्ठानकडे समीक्षा पाठवल्या परंतु 'सातपुते'साठी या प्रतिष्ठानमध्ये जागा नाही कारण मसापच्या दृष्टीने सातपुते यांच्यासारखे अनेक साहित्यिक हे प्रतिष्ठित नाहीत. गेल्या वीस-पचवीस वर्षात कधीही प्रतिष्ठानला भारत सातपुते यांच्या साहित्याबद्दल दोन ओळी छापाव्यात असे वाटले नाही. मराठवाड्यातल्या अनेक ज्येष्ठ साहित्यिकांना डावलण्याचे काम ही मसाप करत असते. शासकीय अनुदानाचा गैरवापर करून मराठवाड्यात जातिवाद, गटबाजी व पंगाटरामांच्या  गॅंग विषारी सापाच्या रूपाने  मसपा  कशी निर्माण करते याबद्दल आपण सविस्तर बोलणार असल्याची भावना भारत सातपुते यांनी व्यक्त केली आहे.
Previous Post Next Post