सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : एकीकडे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलाना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दुर्बल घटकातील इयत्ता १ ते ४ थी तील मुलींना वर्षाला केवळ २२० रुपये उपस्थिती भत्ता दिला जात आहे. लाडक्या बहिणीच्या लाभात वाढ करण्याची मागणी होत असताना मात्र सावित्रीच्या लेकीची कोणाला चिंता का नसावी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सावित्रीच्या लेकीना दिले जाणाऱ्या २२० रुपयामध्ये शैक्षणिक गरजा पूर्ण होणे, शक्य नाही. विद्यार्थिनींना दप्तर, पेन, वह्या, बुक, सॉक्स यासाठी खर्च येतो. या तुटपुंजी मदत मध्ये कोणत्याही गरजा पूर्ण होत नसुन दिले जाणाऱ्या भत्त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. राज्य सरकारकडून एकीकडे लेक लाडकी सारख्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू मुलींना फारच कमी भत्ता दिला जात आहे. हे दुर्दैव आहे. मुलींच्या उपस्थिती भत्त्याची रक्कम किमान वार्षिक रक्कम १५०० हजार रुपये करण्यात यावी. अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. त्यामुळे सर्वत्र महागाईचा विचार करता, ग्रामीण भागात शिकणाऱ्या प्रोत्साहित करण्यासाठी या भत्त्यात वाढ होणे काळाची गरज आहे.
दुर्बल घटकातील मुलींना इयत्ता १ ली ते ४ थीत शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी ही योजना आहे. या योजनेत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील अनु जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीतील दारिद्रय रेषेखालील मुलींना दररोज १ रुपया याप्रमाणे वार्षिक २२० रुपये उपस्थिती भत्ता मिळतो. यासाठी शाळेत किमान ७५ टक्के उपस्थिती आवश्यक असते. गट शिक्षणाधिकारी मार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव मंजूर केले जाते.