पहापळ येथील उडाले शाळेचे छप्पर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : तालुक्यातील पहापळ येथील शाळेवरील छप्पर उडालेले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वादळ वाऱ्याच्या तडाख्याने दोन वर्ग खोल्यांचे छत जमीनदोस्त झाल्याने येथील विद्यार्थ्यांचा वर्ग कुठे भरवावा असा प्रश्न गावातील पालक तसेच शिक्षकात निर्माण झालेला असून अवघ्या काही दिवसानंतर शाळेची घंटा वाजणार आहे.
         

9 जूनला मारेगाव तालुक्यात वादळाने अनेक गावांमध्ये मोठे नुकसान केले. यात तालुक्यातील चनोडा, कुंभा, वरुड, मार्डी, गाडेगाव तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुद्धा वादळाने होत्याचे नव्हते केले. अनेकांची घरे जमीनदोस्त केली.तर काही नागरिकांच्या घरावरील छप्पर उडाले. जनावरांचे गोठेसुद्धा उडाले तर मोठ मोठी वृक्ष उन्मळून पडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. अशातच तालुक्यातील पहापळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्यावरील छप्पर उडाले. यामुळे वर्गखोलीमध्ये असणारे साहित्य ओले झाले.
        

काही दिवसानंतर शाळा सुरु होणार असून आता विद्यार्थ्यांना कुठे बसवावे असा प्रश्न पालक तसेच शिक्षकांना पडलेला आहे. कारण आधीच कमी वर्गखोल्या अशी जी. प. शाळेची अवस्था असते. त्यात दोन वर्गखोल्यावरील छप्परच उडून गेल्याने आणि समोर पावसाळा असल्याने या वर्गखोल्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

"पहापळ येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाल्याची माहिती मला मिळाली. याबाबतचा अहवाल तहसीलदार मारेगाव यांना पाठविण्यात आलेला आहे. पावसाळा येऊन ठेपलेला आहेत आणि शाळा सुद्धा लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची कसलीही गैरसमोर गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न करून त्वरित या शाळांची दुरुस्ती केल्या जाईल."

~भीमराव व्हनखंडे 
गटविकास अधिकारी, पं. स. मारेगाव