सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : राज्य शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते खुले करून ग्रामस्थांना वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला संबंधित विभाग डोळेझाक करत असल्याने त्या प्रश्नाकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी भालेवाडी शिवारातील शेतकरी यांनी मार्डी मार्गांवरील पाथरी (फाटा) येथे आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
भालेवाडी येथील पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी स्तरावर गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करुनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून भालेवाडी सह परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वर्ष २०२१-२२ या वर्षातील मातोश्री ग्राम समृध्द शेत पांदण रस्ता (भालेवाडी) मंजुर असलेल्या कामा संदर्भात वारंवार निवेदनाच्या माध्यमातुन आपल्याकडे विचारणा केली असता, अद्याप त्यावर कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही संबंधित विभागाकडुन झालेली दिसत नाही. आजच्या स्थितीला शेतीचे कामाकरीता ये जा करण्याचा मार्ग या ठिकाणी बंद पडलेला असून जिवास धोका उध्दभवत आहे. त्यामुळे रस्त्याची पर्यायी व्यवस्था आपल्या विभागाकडुन करुन देण्यात यावी. तसेच मंजुर पांदण रस्त्याचे काम मार्गी लावावे. यासाठी प्रशासनाला ४ दिवसाचा वेळ सुद्धा देण्यात आला होता, मात्र अजूनही या प्रश्नावर प्रशासन गंभीर नसल्याने आज मंगळवार दि.२३/०७/ २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून भालेवाडी सुधाकर बोढे यांच्या शेताजवळ सर्व शेतकरी उपोषणकर्ते रसिका दर्वे, अस्मिता चेंडे, संगीता वैरागडे, भाग्यश्री, अंजली दर्वे, हरिदास कापसे, सतीश पाल, बेबी कापसे, वंदना मत्ते, संजय दर्वे, अविनाश कुमरे, गोवर्धन तोडासे हे आमरण उपोषणाला बसले असून या दरम्यान, कुठल्याही स्वरुपाची हानी झाल्यास सर्वस्वी तालुका प्रशासन जबाबदार राहील असा ईशाराही निवेदनातून दिला आहे.
पांदण रस्त्यासाठी आजपासून शेतकऱ्यांचे उपोषण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 23, 2024
Rating: