सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : तालुक्यात अनेक कोळसाखाणी, गिट्टी क्रेशर आहेत. मात्र,या कोळसाखाणी, गिट्टी क्रेशर व डोलोमाईट ला शेतीलागून असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवावर या कंपनी उठल्या असताना प्रशासन चीर निद्रेत असल्यामुळे वणी तालुक्यातील कुंड्रा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना गेल्या एक महिन्यापासून नुकसान भरपाई ची प्रतीक्षा सह संबंधितावर कारवाई करा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील कुंड्रा येथील धनराज बाजीराव येसेकार या शेतकऱ्याचे शेत कृष्णांनपुर शेतशिवारात गटक्रमांक 95 मध्ये असून याच शेताच्या बाजूला असलेल्या गटक्रमांक 66 मध्ये जगदंबा डोलोमाईट ही कंपनी आहे. या कंपनीतून निघणारा संपूर्ण धूर धनराज येसेकार यांच्या शेतातील पिकांवर बसून पिक कोलमडून नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. जेव्हापासून ग.क्र. 66 मध्ये कंपनी सुरू झाली तेंव्हापासून या डस्ट मुळे संपूर्ण पिकाचे नुकसान होत असल्याने याबाबत वणी तहसीलदार यांना दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या शेतकऱ्याने कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी निवेदन दिले होते. परंतु एक महिना लोटूनही तहसीलदाराने स्वतः किंवा कोणताही अधिकारी शेतात पाठवून चौकशी केली नाही. अशी तक्रार शेतकऱ्याने केली असून या शेतकऱ्याने मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी निवेदन दिले. परंतु पाणी मुरते कुठे हे अजूनही कळायला मार्ग नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कंपनीवर कारवाई झाली नसुन एखाद्या शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना शासनाला जाग कशी काय? येत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. आपलं नुकसान होत असल्यामुळे जेव्हा कधी हा शेतकरी कंपनीमध्ये जावून कंपनीचा धुरीबद्दल प्रामाणिक विचारणा केली असता कंपनीमार्फत याच शेतकऱ्यावर शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दाखल केली असल्याचे शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे शेतकरी आता हतबल झाला असून, जर त्याला न्याय मिळाला नाही तर सदर शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा गर्भीत इशारा दिला आहे, परिणामी तत्काळ मागणीची दखल घेणे आता उचित ठरणार आहे, शेतकरी मेटाकुटीस आल्याने कोणतीही अनुचित घटना घडण्याच्या आधी कंपनीवर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.