सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. त्या वेळी त्यांनी भारतीय ग्रामीण क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आणि आजही त्यांनी केलेल्या कार्याची अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थां प्रेरणा घेत आहेत.
विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. त्यासाठी त्यांनी भजनांचा आणि किर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्गार म्हणजे ग्रामगीता होय. तुकडोजी महाराज म्हणायचे, "माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला, अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे, हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे.''
त्यामुळे महाराजांच्या कार्याला,उपदेशाला पुन्हा घराघरात पोहचवण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळ मारेगाव यासाठी 'गांव तिथे ग्रामगिता हे अभियान' 25 डिसेंबर 2022 पासून दर रविवारी गावोगावी जाऊन राबवित आहे. ग्रामगिता वाचा, ग्रामगिता आचरणात आणा, ग्रामगिते प्रमाणे आपलं गांव स्वयंपूर्ण करा, ग्रामगितेचा दिवा घरोघरी लावा हे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. दि. 12 मार्च रविवारी रोजी महागाव येथे हे अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच अविनाश भाऊ लांबट, प्रमुख अतिथी पाटील गुरुजी (उपसर्वाधिकारी), डॉ मुळे (निर्वाचन अधिकारी), पद्माकर डाखरे, (जिल्हा सेवधिकारी), रुपेश ढोके (प्रचारक), लिहीतकर दादा (प्रचारक), होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन मिलमिले यांनी केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे अनिल नावडे, बंडू सुरु, पांडुरंग कालेकर, सुनील देऊळकर, मत्ते दादा, येवले दादा, भास्कर आत्राम, मुरलीधर बलकी, चंद्रभान खापणे, विलास दर्वे, जानराव कोटनाके, दादाजी टेकाम, मनोहर नेहारे, कृष्ण पिंपळकर, बंडूजी वाघाडे,यासह समस्त महागांव ग्रामवासी उपस्थित होते.