Page

चंद्रपुरात पहिल्या रुग्णाला किमो थेरेपीद्वारे उपचार !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यात किमो थेरेपी सुरू झाली .ही किमो थेरेपी सत्रे आणि सेवा चंद्रपूर कॅन्सर केअर फौंडेशनच्याच्या सक्षम वैद्यकीय पथकाद्वारे मोफत दिली जात आहे.

चंद्रपूर कॅन्सर केअर फौंडेशन हे टाटा ट्रस्टस व महाराष्ट्र सरकार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालाय(डिएमईआर) तसेच डिस्ट्रिक्ट मिनरल फौंडेशन(डिएमएफ) यांच्या संयुक्त विद्यमानाने अत्याधुनिक 'डे केअर केमोथेरपी सेंटर'ची सुरुवात झाली आहे. कॅन्सर अर्थात कर्करोगाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी कॅन्सर ग्रस्त रुग्णांना प्रथमच किमो थेरेपी सुविधा दिली जाणार आहे.दरम्यान याचा सर्वाधिक लाभ चंद्रपूर,गडचिरोली व लगतच्या आंध्रप्रदेशातील रुग्णांना होणार आहे.

दि.4 फेब्रुवारी 2022 रोजी जागतिक कर्करोग दिनाच्या दिवशी या डे केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते. काल दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पहिल्या रुग्णाला किमो थेरेपी देण्यात आली. यावेळी टाटा ट्रस्टस कॅन्सर केअरच्या वतीने ओंकॉलॉजिस्ट 
डॉ. गोपीचंद वरटकर यांनी काल अंडाशयाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथम किमो थेरेपी दिली.

यावेळी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, टाटा ट्रस्ट कॅन्सर केअरच्या अकॅडमीकस विभागाचे प्रमुख डॉ. कैलास शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली डे केअर सेंटर चे काम सुरू आहे.

या ठिकाणी अत्याधुनिक साहित्यांसह 8 बेडची स्वतंत्र सोय असणार आहे. डे केअर सेंटरमध्ये सर्व प्रकारची महागडी औषधी,डॉक्टर्स व कर्मचारी मंडळी टाटा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात बायोसेफ्टी कॅबिनेट,लॅमीनर फ्लो व मल्टि पॅराचा प्रामुख्याने समावेश आहे. केमोथेरपीचे सायकल असतात,कधी कधी केमोथेरपी झाल्यावर रुग्णांना त्रास झाल्यास पुढील उपचाराची गरज भासते. म्हणून 8 बेडची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.,डॉ.गोपीचंद वरटकर, ओंकॉलॉजिस्ट, यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांनी किमो थेरेपीचा लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयात येऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.