Page

पावसाने "इचे बीन, कहरच केला, नाई नाई मनता लयच पाणी आला !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२ आक्टो.) : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने चांगलाच कहर केल्याचे पाहायला मिळाले. सुवातीला लहरीपणा दाखविणाऱ्या पावसाने नंतर आपला उग्रपणा दाखविला. बेधुंद बरसलेल्या पावसाने सगळीकडेच हाहाकार माजवला. सर्वांचीच धूळधाण उडविली. धुवाधार बरसनं काय असतं हे यावर्षीच्या पावसाने दाखवून दिलं. गर्जून बरसण्याचाही नागरिकांना चांगलाच अनुभव दिला. "जो बदल गरजते है, वो बरसते नही," हा नागरिकांचा गैरसमजही यावर्षीच्या पावसाने दूर केला. ढगांच्या गडगडाटांच्या आवाजाने कशी दणाणते याचा प्रत्यय आता नागरिकांना चांगलाच आला आहे. विजांच्या कडकडाटाने कानाच्या झिणझिण्या कशा होतात, हा थरकाप देखील नागरिकांनी अनुभवाला आहे. यावर्षी बरसलेल्या पावसाने सगळीकडेच भयावह परिस्थिती निर्माण केली. नदी नाल्यांना भयंकर पूर आले. पूर परिस्थितीने सगळीकडे दाणादाण उडाली. गावांचे संपर्क तुटले. नदीनाल्यांवरील पुलं खचली. घरे कोसळली. लोकं मलब्याखाली दाबल्या गेली. पुरात वाहून गेली. कियेकांना जलसमाधी मिळाली. या आस्मानी संकटाने जनजीवन पार विस्कळीत झालं. निसर्गाच्या प्रलयाने सर्वकाही गमावून बसलेल्यांचा आक्रोश काळीज पिळवटुन टाकणारा होता. या धो धो बरसणाऱ्या पावसामुळे तर कास्तकारांची पुरती दैना झाली आहे. शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कापणीवर आलेलं सोयाबीन बी, सततच्या पावसामुळं गयाबीन झालं. कापसाची बोन्डही अती पावसामुळे गळून पडली. पुराचं पाणी शेतात शिरल्याने पिकं जमीनदोस्त झाली. शेतीचं पार वाटोळं झालं. पावसाचं मुसळधारपण या पावसाळ्यात चांगलंच पाहायला मिळालं. 

थोडी उसंत दिली की, लगेच ढग दाटून येतात, व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडतो. पावसाची तीव्रता अद्यापही कमी झालेली नाही. जलाशय तुडुंब भरली आहे. नद्या दुथडी भरून वहात आहे. धरणं ओव्हर फ्लो झाल्याने पाण्याच्या विसर्गाकरिता काही फुटांनी दरवाजे उघडावे लागत आहे. नद्यानाल्यांच्या पुलावरून पाणी वहात असल्याने कित्येक गावांचे संपर्क तुटत आहेत. नदी नाल्यातून मार्ग काढतांना पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी, शेत मजूर व अनेक निष्पाप जिव वाहून गेले आहेत. पुराच्या पाण्यातून एकमेकांना आधार देत मार्ग काढतांना एकमेकांच्या डोळ्यादेखत त्यांची आपली मानसं वाहून गेली आहेत. बैलबंडीसह कास्तकार वाहून गेले आहेत. नवऱ्याच्या डोळ्यादेखत बायको व भावाच्या डोळ्यादेखत भाऊ पुरात वाहून गेल्याच्या हृदय दावक घटना घडल्या आहेत. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यातून मार्ग काढणारी कित्येक दुचाकी व चार चाकी वाहने नद्या नाल्यांमध्ये वाहून गेली आहेत. यात कित्येकांना जल समाधी मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुद्धा नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून मार्ग काढतांना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी झाली आहे. अजूनही पावसाचा कहर सुरूच असून शासन पुराचा फटका बसलेल्यांना कशा प्रकारे आधार देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.