Page

धनोडा येथील आश्रमामध्ये गुप्तधन सापडल्याची चर्चा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२ आक्टो.) : तालुक्यातील धनोडा गावातील पुसद माहूर रस्त्यावर पैनगंगा नदी लगत असलेल्या श्री चक्रपाणी मठामध्ये खोदकाम करून गुप्तधन काढण्यात आल्याची परिसरात चर्चा सुरू आहे. शेत मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मठाचे दार बाहेरून बंद केले.
मठाच्या बाजूला समोरच १० फूट खोदलेला खड्डा टीन पत्राने झाकून ठेवला आहे. गेल्या काही वर्षांपासून तेथे वास्तव्याला असलेले बाबा खड्डा खोदल्यानंतर अचानक गायब झाले. ते दिल्लीला पळाल्याचे सांगितले जात आहे.

या ठिकाणी असलेले बाबा आणि महिला अचानक मठाचे दार बंद करून व खोदकाम केलेला खड्डा टिनपत्राने झाकून निघून गेले. यापूर्वी असे कधीच घडले नाही. ते कुणाला तरी सांगून जात होते. राणी नावाच्या महिलेजवळ अधूनमधून एक लहान मूल असायचे. ते काही दिवसांपूर्वीच गायब झाले. त्यानंतर खोदलेला खड्डा आणि अचानक पळालेले बाबा, याचा पोलिसांनी शोध घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी,अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

पुसद माहूर रस्त्यावरील जुने बसस्थानक निर्मनुष्य झाले. काही वर्षांपूर्वी तेथील शेतमालकाने एका बाबाला मठाकरिता जागा दिली होती. अनेक वर्षांच्या वास्तव्यानंतर मठातील दोन इसम आणि राणी नावाची महिला रहस्यमयरीत्या निघून गेले. शेत मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मठालगतच्या जागेतील टिनशेड मध्ये १० ते १२ फूट खोल खड्डा करण्यात आला.
खोदताना गरमी होऊ नये म्हणून पंखा लावण्यात आला. लाइटची व्यवस्था केली आहे. गुप्तधनाच्या लालचेपायी खोदकाम करण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे.

या सर्व घटनेचा तपास ठाणेदार विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार रुपेश चव्हाण करत असून त्यांना पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले मदत करत आहेत.