तालुक्यात ठिकठिकाणी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२ आक्टो.) : राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची तालुक्यात ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लालगुडा ग्रामपंचायत येथे व राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय येथे या दोन महापुरुषांची जयंती साजरी करून स्वच्छतेचे काही उपक्रम राबविण्यात आले. लालगुडा ग्रामपंचायतेमध्ये सरपंच धनपाल चालखुरे व उपसरपंच निलेश कोरवते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या जयंतीच्या कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत उपस्थितांकडून ग्रामपंचायत परिसर व गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्वांनीच उस्फुर्तपणे स्वच्छता अभियानात सहभागी होऊन परिसर स्वच्छ केला. 
राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात मुख्याध्यापिका शुभांगी चोपणे यांच्या अध्यक्षतेत जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभुदास नागराळे उपस्थित होते. तर सुनील गेडाम व अनिता टोंगे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या जीवकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थितांनी आपापली मनोगते व्यक्त केली. महापुरुषांनी देशासाठी व समाज सुधारणेसाठी दिलेल्या योगदानाची यावेळी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन तुषार घाणे यांनी तर आभार प्रदर्शन अभय पारखी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शीक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post