सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वडकी-यवतमाळ, (ता.१६ जून) : वणी उपविभागात सुरु असलेले अवैध धंदे बंद व्हावे याकरिता गठीत करण्यात आलेले विशेष पोलिस पथक अवैध धंदे करणाऱ्यांचा कर्दनकाळ ठरू लागले आहे. एका मागून एक अवैध धंद्यांवर धाड टाकून अवैध धंद्यात गुंतलेल्यांच्या मुसक्या आवळल्याने विशेष पोलिस पथकाची काळा बाजार चालवणाऱ्यांनी आता चांगलीच धास्ती घेतली आहे. छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांची गोपनीय माहिती मिळवून अवैध धंदे करणाऱ्यांवर धडक कार्यवाही करण्याचे सत्रच विशेष पोलीस पथकाने सुरु केल्याने अवैध धंद्यात गुंतलेल्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे. विशेष पोलिस पथकानं सुरु केलेल्या धाडसत्रात काल १५ जूनला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वडकी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी येथील एका गोदामावर धाड टाकून त्याठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त केला. प्रतिबंधित वस्तूंचा साठा करणाऱ्या व्यावसायिकाच्या घर व गोदामातून एकंदरीत ८ लाख ५१ हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा पोलिसांनी जप्त केला.
विशेष पोलिस पथकाला वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खैरी येथील रितेश रमेश झामड (३९) या व्यावसायिकाने आपल्या गोदामात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अवैधरित्या साठा करून ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाली. विशेष पोलिस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे यांनी आपल्या पथकासह खैरी गाव गाठून रितेश झामड यांच्या गोदामावर धाड टाकली असता त्याठिकाणी मादक पदार्थांचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराचीही झडती घेतली. तेथेही मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व गुटखा आढळून आला. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने व्यावसायिक या काळ्या धंद्यात गुंतले आहेत.
मादक पदार्थाची तस्करी व विक्रीतून झटपट मालदार होण्याचा शॉर्टकट अनेकांनी अवलंबिला असून आता या शॉर्टकट मार्गावर विशेष पोलिस पथक तैनात करण्यात आलं आहे. पोलिस पथकानं रितेश झामड यांच्या घर व गोदामातून तब्बल ८ लाख ५१ हजार ९८० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. रितेश झामड यांच्यावर पुढील कार्यवाही करिता वडकी पोलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आलं आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलिस पथक प्रमुख मुकुंद कवाडे, राजू बागेश्वर, जितेश पानघाटे, मुकेश करपते, मिथुन राऊत, निलेश, अजय, वाहन चालक अजय महाजन यांनी केली.