सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : हिंदू समाजातील सज्जनशक्ती संघटित करून राष्ट्रभक्ती, चारित्र्य आणि संयमाच्या बळावर भारतमातेला परमवैभवाप्रत नेणे आवश्यक आहे. शाखेच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माणाचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असून, राष्ट्रउभारणीसाठी समाजातील सर्व स्तरांत राष्ट्रनिष्ठेची भावना रुजविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहशारीरिक प्रमुख पंजाबराव अव्हाडे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०१ व्या वर्षानिमित्त शनिवारी, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी वणी येथील एसपीएम विद्यालयाच्या प्रांगणात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अव्हाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीक कावडे होते. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत आणि नगर संघचालक किरण बुजोने उपस्थित होते.
अव्हाडे यांनी संघाच्या १०१ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनशक्ती, व्यक्तिनिर्माण आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जपणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. हिंदुत्व ही केवळ धार्मिक ओळख नसून जीवनपद्धतीचा स्वभाव आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे प्रतीक मानून मातेसमान स्थान दिले जाते. आपल्या सांस्कृतिक स्वत्वाचा विसर पडल्यास समाजाला परकीय गुलामगिरीचा सामना करावा लागला, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भगवा ध्वज हा प्रेरणेचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी शारीरिक सामर्थ्यासोबत बौद्धिक प्रगती आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्याची आवश्यकता विशद केली. मन, मनगट आणि बुद्धी यांचा विकास झाल्याशिवाय राष्ट्राची भक्कम उभारणी शक्य नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार समाजात रुजविण्यासोबतच पंचपरिवर्तनाची सुरुवात प्रत्येक स्वयंसेवकाने आपल्या घरातून करावी, असे आवाहनही त्यांनी केले. भारतीय समाजाची एकात्मता टिकविण्यात कुटुंबसंस्थेची भूमिका महत्त्वाची असून, राष्ट्रनिष्ठा आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समाजाचे स्वास्थ्यही शरीराइतकेच महत्त्वाचे
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रतीक कावडे यांनी विजयादशमी हा सत्याचा असत्यावरील विजय दर्शविणारा आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा सण असल्याचे सांगितले. मानवी शरीरातील २०६ हाडांपैकी एखाद्या भागात किंवा सांध्यात समस्या निर्माण झाल्यास शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे समाजजीवनातील परस्पर सामंजस्याचे दुवे कमकुवत झाल्यास सामाजिक स्वास्थ्य बिघडते, अशी मार्मिक तुलना त्यांनी केली.
तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्यांची रुजवण करून त्यांना राष्ट्रउभारणीसाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या शारीरिक आरोग्याइतकेच समाजाचे स्वास्थ्य जपणेही महत्त्वाचे असून, त्यासाठी राष्ट्राप्रती समर्पित भावनेने कार्य करण्याची गरज असल्याचे डॉ. कावडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके आणि सामूहिक कवायत सादर करण्यात आली. नगर संघचालक किरण बुजोने यांनी प्रास्ताविक केले. श्रेयश धगडी यांनी सुभाषित, तर आदित्य पांडे यांनी अमृतवचन सादर केले. प्रवीण सातपुते यांनी वैयक्तिक गीत सादर केले, तर कृष्णकुमार पानेरी यांनी सांघिक गीत घेतले. प्रसाद चिडले यांनी उत्सवाचे मुख्य शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न झाला.