टॉप बातम्या

राजूर रिंग रोडवरील अवैध कोल डेपो, खाजगी रॅक पॉईंटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : तालुक्यातील मौजा निंबाळा रोड येथील रुक्माई कोल वॉशरी ते राजूर रिंग रोड व राजूर गावातील मुख्य महामार्गाच्या 500 मीटर हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत व अवैध कोल डेपो व खाजगी रॅक पॉईंट सुरू आहेत. या अवैध धंद्यामुळे संपूर्ण राजूर नगरीत प्रदूषणाचा विळखा वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मौजा निंबाळा, राजूर, कळमना व पळसोनी हद्दीतील सर्व कोल डेपो धारकांचा मुख्य खाजगी स्टॉक पॉईंट राजूर रेल्वे साईडिंगच्या शासकीय जागेवर उभारण्यात आला आहे. या अवैध कोल डेपो / रॅक पॉईंटला प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर व संबंधित ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही.

या संदर्भात दि. 07/08/2026 रोजी उपविभागीय अधिकारी, वणी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दि. 04/09/2026 व दि. 21/09/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे बैठका घेऊन अवैध कोल डेपो तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र संबंधित कोल डेपो धारकांनी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले सर्व डेपो राजूर परिसरात व मुख्य मार्गावर स्थलांतरित केले आहेत.

प्रमुख मागण्या व समस्या:

1) प्रदूषणाचा कहर:* ओव्हरलोड कोळसा व डोलोमाईट वाहतुकीमुळे राजूर गावात काळ्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. लहान मुले व वृद्धांमध्ये श्वसनाचे आजार वाढले आहेत.

2) रिंग रोड उद्ध्वस्त:* अवजड ओव्हरलोड वाहतुकीमुळे राजूर रिंग रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः राजूरला प्रत्यक्ष भेट देऊन रिंग रोड व रेल्वे साईडिंग परिसरातील अवैध कोल डेपो व खाजगी रॅक पॉईंटची पाहणी करून कारवाई करावी व ओव्हरलोड वाहतूक व अवैध डेपो तात्काळ बंद करावेत, अशी मागणी लढा संघटना वणी विधानसभा व समस्त राजूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रवीण खानझोडे 
समस्त राजूर ग्रामस्थ व लढा संघटना, वणी
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();