टॉप बातम्या

चंद्रपुरात बाप्पाच्या विसर्जनाला हायटेक सुरक्षेचे कवच

 सह्याद्री चौफेर | किरण घाटे 

चंद्रपूर : आगामी गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी चंद्रपूर शहर पोलिसांनी कंबर कसली असून शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. या भव्य मिरवणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही बाका प्रसंग उद्भवू नये, या उद्देशाने तब्बल १२० अधिकारी आणि १००० पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

यावर्षीच्या बंदोबस्ताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षेसाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सीसीटीव्ही व्हॅनचा वापर केला जाणार आहे. या हायटेक प्रणालीद्वारे सराईत गुन्हेगार आणि परिसरातील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर पोलिसांची थेट नजर राहील. यासोबतच विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून होमगार्ड आणि वाहतूक पोलिसांचे विशेष पथकही रस्त्यावर उतरणार आहे.या शिवाय मुख्य मार्गावर कमानी उभारण्यात आलेल्या आहे.

मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, गर्दीचा गैरफायदा घेत होणारी छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलिसांचे विशेष पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घालणार आहेत. दरम्यान, सर्व गणेशभक्तांनी हा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. तसेच स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत पोलीस प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे, असे महत्त्वाचे आवाहन चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();