सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन मारेगाव येथे दाखल गुन्हा क्र. 142/2026 अंतर्गत अज्ञात आरोपींनी घरफोडी करून सुमारे 21 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू ठेवत संशयितांचा शोध घेतला होता.
दरम्यान, दिनांक 1 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्याने उमरखेड रोडवरील कोपरा फाटा परिसरात सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव नथ्थू नागू कुरकुटे (वय 30, रा. मोहदरी, ता. उमरखेड) असे सांगितले. तपासादरम्यान सदर आरोपी हा मारेगाव पोलीस स्टेशनमधील गुन्हा क्र. 142/2026 मधील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून चौकशीदरम्यान काही सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. पुढील चौकशीत आरोपीने इतर दोन साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 9,30,308 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक बोराट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे यांच्या नेतृत्वात पार पडली.पथकात सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि/ धनराज हाके तसेच पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुभाष जाधव, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, रजनिकांत मडावी आणि चालक सतीश फुके यांचा समावेश होता.
या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.