सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखा मारेगाव तसेच तालुक्यातील समस्त गुरुदेव उपासक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११७ वा ग्रामजयंती उत्सव व कार्यकर्ता मेळावा शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी मार्डी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश महाराज वाघ (सर्वाधिकारी, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम) होते. उद्घाटक म्हणून गोपाल कडू (प्रचार प्रमुख, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री पाटील गुरुजी (कार्यकारी सदस्य, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम), श्री मारोतराव ठेंगणे (प्रचार प्रमुख, यवतमाळ जिल्हा), श्री खंगार महाराज (राळेगाव तालुका प्रचार प्रमुख), श्री लोनसावळे महाराज (तालुका कीर्तनकार प्रमुख), सौ. विजया दहेकर (जिल्हा महिला सेवाधिकारी, यवतमाळ) तसेच ह.भ.प. सुवर्णा पिंपळकर (जिल्हा महिला सेवाधिकारी, चंद्रपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात संकल्प गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान व संगीतमय स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समिती प्रमुख गजेंद्र पालकर यांनी केले. उद्घाटक मनोगतात गोपाल कडू यांनी प्रचारक हा नम्र, चौकस व सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेला असावा, असे प्रतिपादन केले.
या वेळी तालुक्यातील दिवंगत ज्येष्ठ प्रचारक तात्याजी सोमलकर व मुकुंद राजूरकर यांच्या कार्याची आठवण ठेवत त्यांच्या सहचारिणींचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच ग्रामगीता जीवन विकास परीक्षा उत्कृष्टपणे राबविणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. पुरुष व महिला प्रचारकांचाही सत्कार करण्यात आला.
ग्रामविकासासाठी वैचारिक ग्रामजयंती सप्ताह राबविणाऱ्या सरपंच सौ. सुषमा ढोके (कानडा) व सरपंच अनिल देऊळकर (मजरा) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्रिमूर्ती मंगल कार्यालयाचे संचालक अभय जुमडे व शिव महापुराण समिती, मार्डी यांनाही राष्ट्रसंतांच्या प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात प्रकाश महाराज वाघ यांनी राष्ट्रसंतांना अभिप्रेत अध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रामविकास करणे हीच खरी ग्रामजयंती असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किसन मत्ते यांनी केले.
तालुक्यातील सर्व गुरुदेव उपासकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.