सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील एका ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गोरज येथे घडली आहे.
अविनाश लटारी पानघाटे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपविले. ही घटना शेतालगत उत्तम पानघाटे यांच्या शेतातील बांभळीच्या झाडाजवळ घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मृतकाचा भाऊ पुरुषोत्तम पानघाटे यांनी पोलीसांना दिल्यानंतर तत्काळ घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
मृतदेह उत्तरनिय तपासणीसाठी मारेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, दुपारी २ वाजता गोरज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अविनाश पानघाटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.