सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील कोथूर्ला येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, गाड्यात पडल्याने शेतकऱ्याचा एक बैल जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर येथून शेतकरी बैल बंडीने गव्हाचे पोते घेऊन कोथूर्ला कडे जात असताना ही दुर्घटना घडली. संबंधित ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रस्त्यांच्या मधोमध असलेल्या खोदलेल्या गड्यात कोणतीही सुरक्षितता किंवा अडथळा नसल्याने अंदाजे दहा तें वीस फूट खोल बैल बंडी थेट गड्यात कोसळली.
या अपघातात महादेव बोन्डे (वय ५५, रा. रामेश्वर) यांची कंबर मोडली असून प्रसाद झाडे (वय ३२, रा. कानडा) यांचे एक पाय फ्रॅक्चर तर संदीप चहानकर (वय ३८, रा. रामेश्वर) यांना कमरेला,हाताला आणि एक पाय फ्रॅक्चर असल्याची माहिती समोर आली आहे. तिघांनाही तातडीने वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातात एक बैल जागीच ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वृत्त लिहेपर्यंत संबंधित विभाग घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
नागरिकांचा संताप :
स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून, अपूर्ण पुलाच्या कामामुळे आणि सुरक्षेच्या अभावामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित ठिकाणी योग्य खबरदारी घेण्यात आली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्याचे मोठे नुकसान :
पीडित शेतकरी व जखमींना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पुलाच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.