सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी शहरातील गणेशपूर परिसरात लहानग्या विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. छोरिया रेसिडेन्सी येथील गणपती रेसिडेन्सी विंग ‘बी’ मधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वापरातील, दुरुस्तीयोग्य सायकली स्माईल फाउंडेशनला दान करून शिक्षणासाठी झटणाऱ्या गरजू मुलांना मदतीचा हात दिला आहे.
या उपक्रमासाठी प्रा. प्रवीण फटाले यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांकडून सायकली संकलित केल्या व त्या फाउंडेशनकडे सुपूर्द केल्या. या सायकलींची दुरुस्ती करून त्या गरीब, अनाथ तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणार आहेत. सायकल दुरुस्तीच्या खर्चातील काही भाग डॉ. विश्वास सुंदरानी यांनी उचलून या उपक्रमाला मोलाचे योगदान दिले आहे.
सायकल दानासाठी आवाहनस्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर देविदास जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सायकलची गरज आहे त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. तसेच, शहरातील नागरिकांनी आपल्या वापरात नसलेल्या पण दुरुस्त होऊ शकणाऱ्या सायकली दान कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
फाउंडेशनकडून सायकल दुरुस्तीचा पूर्ण खर्च उचलला जाणार असून, घरून सायकल संकलनाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमातून लहानग्यांनी समाजाला दिलेला संदेश स्पष्ट आहे—दान हे केवळ पैशांतच नाही, तर उपयोगी वस्तू देऊनही करता येते. शिक्षणासाठी पुढे आलेले हे छोटे हात आज समाजासाठी आशेचा किरण ठरत आहेत.