सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील अवैध जुगार व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेत प्रभावी कारवाई केली आहे. दिनांक १ जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत सिंधी कॉलनी, एकता नगर, भाजी मंडी, दीपक चौपाटी, लालगुडा परिसर आदी ठिकाणी लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकण्यात आली.
या कालावधीत जुगार कायद्यांतर्गत एकूण ५३ केसेस दाखल करण्यात आल्या असून सुमारे ३ लाख ५१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून सातत्याने माहिती संकलन करून विशेष पथकांच्या माध्यमातून ही कारवाई राबविण्यात येत आहे.
या मोहिमेमुळे शहरातील अवैध जुगार व्यवसायावर मोठ्या प्रमाणात आळा बसत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांनी दिली.
तसेच, नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.