सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी तक्रार नोंदवली आहे की, दिनांक २२ आगस्ट २०२५, शुक्रवार, वेळ सकाळी ९ ते ११ दरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप न करता मोबाईलची सेटिंग्ज आपोआप बदलली. हा प्रकार केवळ वैयक्तिक नसून देशभरातील सुमारे ८० ते ९० टक्के मोबाईल वापरकर्त्यांच्या डायल पॅडमध्ये परवानगीशिवाय बदल झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती त्यांनी दिली.
सदर घटना अत्यंत गंभीर असून, यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती, डिजिटल व्यवहारांची विश्वासार्हता तसेच इलेक्ट्रॉनिक यंत्रणांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी संबंधित नागरिकानी मा. तहसीलदार, वणी यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत.
संभाजी ब्रिगेडच्या पुढीलप्रमाणे मागण्या:
१)मोबाईल सेटिंग्जमध्ये झालेल्या अनधिकृत बदलांची सखोल चौकशी करावी. २)जबाबदार मोबाईल कंपन्या, सर्व्हर किंवा अॅप्लिकेशन्सचा तांत्रिक अहवाल जाहीर करावा. ३)सामान्य नागरिकांच्या मोबाईल व माहिती सुरक्षिततेसाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे व उपाययोजना राबवाव्यात. ४)इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) सह सर्व शासकीय इलेक्ट्रॉनिक साधनांची स्वतंत्र तपासणी समितीमार्फत सुरक्षा तपासणी करण्यात यावी.
सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, शासनाने तातडीने यावर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी आशिष रिंगोले, दत्ताभाऊ डोहे, वसंतभाऊ थेटे व इत्यादी कार्यकर्ते हजर होते.