सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज वणी उपविभागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, तालुक्यातील तेजापूर येथील धम्मरत्न सुधाकर भगत (25) यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाली. जखमीवर उपचार सुरु आहे. ही घटना ताजी असताना मारेगाव तालुक्यातील किन्हाळा शेतशिवारातही वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना समोर आली. अनिल रमेश फरताडे (वय 34) रा. पांढरकवडा (पिसगाव) असं वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अनिल हे मक्त्याने शेती करत होते, आज ते ठेक्याने केलेल्या शेतात गेले होते, बऱ्याच विश्रांतीनंतर वरून राजाने आज बुधवारला दुपारी जोरदार पावसाची हजेरी लावली. यात विजेचा कडकडाट झाला. अशातच शेतात असलेले अनिल फरताडे यांचेवर विज पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अडीज ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सदर घटनेची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली, मात्र, घरातील कर्ताधर्ता अकाली निघून गेल्याने फरताडे कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मृतक अनिल याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी व बहीणी असा परिवार आहे. वणी उपविभागात आज मुसळधार पावसासह विजेचा कडकडाटाचा कहर केल्याने सदर दोन्ही वेदनादायी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.