अभिष्टचिंतन...
यवतमाळ जिल्ह्यातल्या आमच्या वणी जवळील मानकी हे त्यांचं मूळ गाव. सुरुवातीपासूनच अत्यंत धडपड्या कार्यकर्ता अशीच त्यांची ख्याती आहे. गावातही ते विविध उपक्रमांमध्ये गुंतलेलेच असतात. त्यांच्याशी जुळवायला वयाचे बंधन नाही. अगदी 9 ते 90 या वयोगटांतील सगळे त्यांचे दोस्त आहेत. कितीतरी दोस्तांचे जन्मदिवस त्यांच्या लक्षात असतात. लिहून ठेवलेले असतात. न विचारता त्यांना ते सदिच्छा देतात.
सागराप्रमाणे शांत असं त्यांचं व्यक्तिमत्व. आजपर्यंत त्यांना कुणावरच रिऍक्ट होताना मी तरी पाहिलं नाही. ते चांगले लिसनर आहेत. पुढील व्यक्तीचं म्हणणं ते शांतपणे ऐकतात. तिला समजून घेतात. आणि मगच आवश्यकता वाटल्यास त्यावर प्रतिक्रिया देतात.
परशुराम भाऊ हे गावात कधीच एकटे दिसत नाहीत. त्यांच्यासोबत गोतावळा लागलेला असतो. हे इथल्या पतसंस्थेचे एजंट आहेत. संध्याकाळी पतसंस्थेचं कलेक्शन करतानाही त्यांच्या गाडीवर कोणी ना कोणी असतोच.
ते उत्कृष्ट नळ कारागीर म्हणजे प्लंबर आहेत. ते नगरपालिकेचे अधिकृत प्लंबर आहेत. शहरातल्या मॅक्झिमम नवीन वस्त्यांमधील नळ फिटिंगची कामं यांच्याच हातची आहेत.
नवीन घर बांधताना नळ फिटिंग झाली, की घर मालकाचा आणि प्लंबरचा तसा विशेष संबंध राहत नाही. मात्र परशुराम भाऊंच्या स्वभावामुळे दहा-दहा, पंधरा वर्षे जुने घरमालक आजही त्यांच्या संपर्कात असतात.
वणी नगरपालिकेच्या कोंडवाड्याचे ते कंत्राटी ठेकेदार आहेत. कोंडवाडा म्हणजे मोकाट गुरे पकडून एकत्र ठेवण्याची स्थानिक प्रशासन संस्थेची जागा. त्या गुरांच्या चारापाण्याची तसेच आरोग्याची जबाबदारी ही कंत्राटदाराकडे असते.
परशुराम भाऊ स्वतः शेतकरी आहेत. अस्सल पशुपालक आहेत. त्यांच्या घरीदेखील भरपूर पशुधन आहे. त्यामुळे त्यांच्या कोंडवाड्यात असलेल्या पशुंचीही ते तेवढ्याच आपुलकीनं काळजी घेतात. त्यांच्या चाऱ्यापाण्याचीदेखील उत्तम व्यवस्था करतात.
परशुराम भाऊ एक संवेदनशील कलावंत आणि पत्रकार आहेत. शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. एखादा खटकणारा विषय असला, तर ते लगेच आपली लेखणी उचलतात. त्यावर कडाडून प्रहार करतात. गुणवंतांचं तसंच उत्तम सामाजिक उपक्रमांचं भरभरून कौतुकही करतात.
त्यांचं हस्ताक्षर अत्यंत सुंदर आहे. अलीकडच्या काळात ज्याला कॅलिग्राफी म्हणतात अशी सुलेखन कला त्यांच्या हातात आहे. कामांचा प्रचंड व्याप असला तरी आपल्या सुलेखानाची कला ते जोपासतात.
त्यांच्या मूळ गावी मानकीत, वणीत किंवा मित्र परिवारात अंतिम पर्याय परशुराम भाऊच असतात. अनेक प्रयत्न करूनही एखाद्याची समस्या दूर होत नसेल, तर अत्यंत विश्वासानं अनेक जण परशुरामभाऊकडेच येतात. त्यांचा विषय समजून त्यावर ते हमखास तोडगा काढतात. तो विषय हाताबाहेरचा असेल तर ते तसंही स्पष्ट सांगतात.
प्रपंच आणि परमार्थ यातील समतोल त्यांनी साधला आहे. संतांच्या शिकवणीनुसार ते व्यवहार करतात. सर्वांच्या भल्यासाठी अहोरात्र झटतात. अशा भल्या माणसाला जन्मदिवसाच्या खूप खूप सदिच्छा.
~सुनील इंदुवामन ठाकरे
5 जुलै 2025
वणी