हनुमान मंदिरातील चांदीचे दागिने चोरी प्रकरणी आरोपी जेरबंद

सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार

पांढरकवडा : शहरातील सराफा लाईन भागात शनिवार दि.१० मे २०२५ रोजी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून हनुमान मंदिरातील चोरलेले चांदीचे दागिने हस्तगत केल्याची मोठी यशस्वी कारवाई पार पाडली.ही घटना आंतरराज्य गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले असून,आरोपीस व मुददेमालास पुढील चौकशीसाठी तेलंगणातील आदिलाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पांढरकवडा पोलिसांना त्यांच्या खात्रीलायक गुप्त माहितीनुसार,एक इसम पांढरकवडा शहरातील सराफा लाईन परिसरात संशयास्पद रीतीने मंदीरातील चांदीचे दागिने विक्रीसाठी फिरत आहे.माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित वर्णनाच्या व्यक्तीस शोधून त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाची विचारपूस केली असता त्याने आपले नाव दयानंद सुर्यभान आत्राम, वय २८ वर्ष,रा.निपाणी,ता.भिमपुर,जि.आदिलाबाद,राज्य तेलंगणा ह.मु.बोटोणी,ता.मारेगाव,जि.यवतमाळ असे सांगितले. त्याच्याकडून चांदीच्या धातूचे खालील दागिने जप्त करण्यात आले,सहा तुकडे मुकुटाचे,गदा,दोन गोल कडे (शेंदूर लागलेले) त्याच्या अंगावरील कपड्यांवर देखील शेंदूराचे डाग आढळले,ज्यावरून दागिन्यांचा मंदिराशी संबंधित असण्याचा संशय अधिक बळावला.प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र,पोलिसांनी कौशल्यपूर्वक केलेल्या सखोल चौकशीनंतर त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.त्याने दि.०९ मे शुक्रवार रोजी रात्री आदिलाबाद शहरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरातून देवाची चांदीची गदा,मुकुट व कडे चोरी केल्याचे सांगितले.या माहितीची खातरजमा करण्यात आली असता,आदिलाबाद शहरातील ०२ टाऊन पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २२५/२०२५,कलम ३३१ (४), ३०५ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली.

पांढरकवडा पोलिसांनी जप्त केलेल्या दागिन्याचे वजन तपासून पाहिले असता,चांदीच्या दागिन्यांचे एकूण वजन १०६.१४० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत २०,०००/- रुपये इतकी आहे.या यशस्वी कारवाईसाठी पांढरकवडा पोलिस यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.स्थानिक पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे,पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर,तसेच पोहेकॉ.प्रमोद जुनुनकर, पो.कॉ.राजू बेलयवार आणि पो.कॉ.गौरव नागलकर यांनी अत्यंत तत्परतेने ही कारवाई पार पाडली.गुन्ह्यातील मुख्य आरोपीस व जप्त दागिन्यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आदिलाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या घटनेमुळे दोन राज्यांच्या पोलिसांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण पुढे आले असून मंदिर चोरीप्रकरणी पुढील तपास तेलंगणा पोलीस करत आहेत.हा गुन्हा धार्मिक स्थळाशी संबंधित असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली होती,मात्र पोलिसांनी तत्परतेने तपास करून आरोपीला अटक केल्यामुळे समाजात विश्वास निर्माण झाला आहे.