सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यात तयार केलेले रस्ते अवघ्या एक ते दोन वर्षात खराब होत आहे. मात्र शहरातील चार वार्डातील रस्ते दाखवून विकास होत असल्याचा भ्रम पसरवला जात आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. ग्रामीण भागातून जाणारा एक तरी रस्ता खड्डा मुक्त दाखवावा आणि एक लाख रुपये घेऊन जा, असे आव्हान शेतकरी न्याय यात्रेचे मुख्य संयोजक आशिष खुलसंगे यांनी दिले. रविवारी संध्याकाळी मारेगाव येथे यात्रेची मारेगाव तालुका सांगता सभा झाली. यावेळी बोलत असताना खुलसंगे यांनी आमदार व भाजपवर कठोर शब्दात घाणाघात केला. सोमवारपासून ही यात्रा झरी तालुक्याचा दौरा करणार आहे.
रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी करणवाडी येथून शेतकरी न्याय यात्रेला सुरुवात झाली. नवरगाव येथे नृसिंग महाराजच्या मंदिरात यात्रेने भेट देत दर्शन घेतले. पुढे यात्रेने हिवरी, गोधणी, केगाव, वेगाव, वेगाव (पोड), कोलगाव, मांगरुळ या गावाचा दौरा केला. यानंतर यात्रा मारेगाव शहरात पोहोचली. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर मार्डी चौक येथे मारेगाव तालुका सांगता सभा झाली.
या सभेचे अध्यक्ष वामनराव कासावार होते. यावेळी नरेंद्र ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात वामनराव कासावार म्हणाले की शेतक-यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळतो. मात्र शेतमजुरांना कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतमजुरांना देखील शासकीय लाभ द्यावा. तसेच तेलंगणा सरकारच्या धर्तीवर शेतक-यांना 10 हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सभेचे प्रास्ताविक मारोती गौरकार यांनी केले. कार्यक्रम सूत्रसंचालन अंकुश माफूर यांनी केले. उपस्थितांचे आभार समीर सय्यद यांनी मानले. सभेला हजारोंच्या संख्येने मारेगाव व तालुक्यातील नागरिकांनी दर्शवली होती. कार्यक्रमाला मारेगांव बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, वसंत जिनिंग संचालक रविंद्र धानोरकर, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, सरपंच तुळशीराम कुमरे, खालिद पटेल, आकाश बदकी, माया गाडगे, छाया किनाके, वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, शहर प्रभारी अशोक पांडे, वसंत जिनिंग उपाध्यक्ष जय आबड, ओम ठाकूर, राजू येल्टीवार, राजू कासावार, राहुल दांडेकर, प्रशांत बघेल, प्रज्योत इनकुंटवार, आशिष ठाकरे, समिर कुळमेथे, शाहरुख शेख यांच्यासह मारेगाव तालुका काँग्रेस, महिला आघाडी, सेवा दल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारेगाव तालुका काँग्रेसने परिश्रम घेतले.