मारेगावात उद्या भारतीय जनता पार्टीचे 'अधिवेशन'

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भारतीय जनता पार्टी,वणी विधानसभा मारेगाव तालुका च्या वतीने उद्या दि. 12 ऑगस्ट रोज सोमवार ला शेतकरी सुविधा केंद्र मंगल कार्यालयात सकाळी 10 ते 3 या वेळात "भाजपा अधिवेशन 2024"चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन संपन्न होणार अशी माहिती तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन ठराव कार्यक्रम च्या अनुषंगाने वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व जिल्हा अध्यक्ष श्री. तारेंद्र बोर्डे व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. 

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळवून देत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे ऐतिहासिक यश मिळविल्याबद्दल ही कार्यकारिणी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते. सहा दशकांनंतर देशात एका नेत्याला सलग तीनवेळा पंतप्रधान होण्याचा मान मोदीजींच्या रुपाने मिळाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारत विकसित देश व्हावा, अशी आकांक्षा बाळगणाऱ्या कोट्यवधी भारतीयांच्या आशा या यशामुळे उंचावल्या आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात गेली दहा वर्षे देशात सर्व क्षेत्रात विकास करून परिवर्तन झाले. आता आगामी पाच वर्षातही सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास कार्यात नवी शिखरे गाठली जातील, असा दृढविश्वास निर्माण झाला आहे.

मोदीजींच्या नेतृत्वात देशात परिवर्तन
प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा एनडीएला मिळालेले संपूर्ण बहुमत हे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या असामान्य कामगिरीमुळे आहे. याच सरकारच्या नेतृत्वाखाली भारत विकसित देश होण्यासाठी भक्कम कामगिरी करू शकतो, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाल्यामुळे हे यश मिळाले आहे. मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या दहा वर्षात अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

मोदी सरकारच्या कर्तृत्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे स्थान उंचावले, देशाला भक्कम संरक्षण लाभले, रस्ते रेल्वे विमानतळ अशा पायाभूत सुविधांचा जबरदस्त विकास झाला आणि आर्थिक विकासाची झेप घेऊन भारत जगात पाचव्या स्थानावर आला. त्यासोबत या विकासयात्रेत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू राहिला. प्रत्येकाला राहण्यासाठी पक्के घर मिळावे, नळाने पिण्याचे पाणी मिळावे, विजेचे कनेक्शन मिळावे, गॅस कनेक्शनची सुविधा असावी, शौचालय असावे, वैद्यकीय उपचार मिळावेत आणि स्वयंरोजगार मिळविता यावा, यासह सर्वांगिण कल्याणासाठी मोदी सरकारने ऐतिहासिक काम केले आहे. ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य, पाच लाखापर्यंत मोफत उपचारांसाठी आयुष्मान भारत योजना, १४ कोटी ९७ घरांना नळाने पाणी, ११ कोटी ५७ घरांमध्ये शौचालये, १० कोटी ३३ लाख मोफत गॅस कनेक्शन, ५२ कोटी लोकांची बँकेत जनधन खाती ही आकडेवारी मोदी सरकारच्या यशाची साक्ष देते. त्यामुळेच मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील पंचवीस कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले.

मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या कल्याणावर विशेष भर दिला. बारा कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षाला सहा हजार रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ५६ कोटी

शेतकऱ्यांची नोंदणी, १ कोटी ७७ लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीसह शेतीमालासाठी ई मार्केटची उभारणी ही कामगिरी मोदी सरकारची शेतकऱ्यांबद्दलची बांधिलकी दर्शविते.

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नव्या उच्च शिक्षण संस्थांची स्थापना, स्वतःच्या व्यवसायासाठी मुद्रा योजनेत ४६ कोटी ९२ लाख कर्जे मंजूर, स्टार्ट अप्सचा जबरदस्त विस्तार अशा कामगिरीमुळे युवकांच्या उज्ज्वल भवितव्याची हमी मिळाली आहे.

देशातील डिजिटल क्रांतीचे नेतृत्व करतानाच या क्रांतीचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी मोदीजींनी केलेले काम सर्वच विकसनशील देशांसाठी स्फूर्तीदायक आहे. कोरोनाच्या महासंकटात मोदी सरकारने केलेली कामगिरी प्रत्येक भारतीयाला दिलासा देणारी होती.

अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराची निर्मिती झाल्याने हिंदू समाजाचा पाचशे वर्षांचा लढा सुफळ संपूर्ण झाला. काशी कॉरिडॉरची उभारणी आणि केदारनाथ परिसराची पुनर्बाधणी यातून मोदी सरकारची देशाच्या सांस्कृतिक वैभवाबद्दलची बांधिलकी स्पष्ट होते. मोदी सरकारने घटनेचे ३७० वे कलम हटविल्यामुळे काश्मीरमध्येही देशाचे संविधान पूर्णपणे लागू झाले. मोदी सरकारने तीन तलाक रद्द केल्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळाला.

मोदी सरकारने सीमापार दहशतवाद यशस्वीरित्या मोडून काढला, देशातील बॉम्बस्फोट रोखले, दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला आणि चीनची आक्रमकता प्रभावीरित्या रोखली. गेल्या दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था जगात अकराव्या स्थानापासून इंग्लंड व फ्रान्सला मागे टाकून पाचव्या स्थानावर आली.

एकूणच मोदी सरकारची गेल्या दहा वर्षातील कामगिरी सर्वव्यापी व सर्वस्पर्शी आहे. दहा वर्षांपूर्वीच्या निराशाजनक आणि निर्णयशून्य भरकटलेल्या अवस्थेतून देशाला बाहेर काढून विकासाच्या महामार्गावर गतीमान होण्यास मोदी सरकारने यशस्वी चालना दिली आहे.

एनडीएचे यश सर्वव्यापी, सर्वस्पर्शी
'सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास', या सूत्राच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने केलेल्या कामगिरीमुळे या लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले व ते सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी आहे. भाजपाचे दक्षिणेमध्ये केरळमध्ये या निवडणुकीत खाते उघडले. केरळमध्ये भाजपाला १६ टक्के मते मिळाली आहेत. तामिळनाडूत भाजपाला ११ टक्के मते मिळाली असून ती नऊ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या दहा टक्के मतांहून अधिक आहेत. आंध्र प्रदेशात एनडीएने विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवितानाच लोकसभा निवडणुकीतही यशाचे शिखर गाठले आहे. ओदिशा विधानसभा निवडणुकीत भाजपाने विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळविले व त्यासोबत लोकसभा निवडणुकीत राज्यात २१ पैकी २० जागा जिंकल्या. अरुणाचल प्रदेशमध्येही भाजपाला विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निर्विवाद यश मिळाले. जम्मू काश्मीरमध्ये भाजपाला पाचपैकी दोन जागा जिंकताना राज्यातील सर्वाधिक मते मिळाली. पश्चिम भारतासह उत्तर व मध्य भारतामध्ये भाजपाने व एनडीएने पारंपरिक वर्चस्व जवळपास कायम राखले. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यात भाजपाने सर्व जागा जिंकल्या तर गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये प्रत्येकी केवळ एक जागा गमावली. एनडीएचे पूर्ण बहुमत हे भौगोलिक व सामाजिकदृष्ट्या सर्वव्यापी आहे.

विरोधकांचा विषारी आणि खोटा नॅरेटीव
देशाचा गौरव, देशाचे संरक्षण, देशाचा आर्थिक विकास आणि देशहिताचे ऐतिहासिक निर्णय या बाबतीत मोदी सरकारची कामगिरी यशस्वी राहिली. देशातील सर्वसामान्यांचे कल्याण आणि गरिबीशी लढा या बाबतीत तर मोदी सरकारच्या विरोधात बोलण्यासारखे मुद्दे मिळत नसल्याने विरोधी पक्ष हताश झाला होता. त्यामुळे हताश झालेल्या विरोधी पक्षांनी खोटा नॅरेटीव्ह आणि विषारी प्रचाराचा वापर करून लोकसभा निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढवली. मोदीजींच्या विरोधात भिन्न विचारांचे आणि एरवी एकमेकांचे शत्रू असलेले विविध राजकीय पक्ष आपापली घराणेशाही राखण्यासाठी एकत्र आले. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही कार्यक्रम नव्हता किंवा देशाला विकसित राष्ट्र कसे करायचे याचा कोणताही रोडमॅप त्यांनी मांडला नाही. केवळ काल्पनिक भितीच्या आधारे मतदारांना भ्रमित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पुन्हा सत्तेवर आल्यास भाजपा संविधान बदलेल आणि आरक्षण रद्द करेल, असा खोटारडा आणि कपोलकल्पित आरोप त्यांनी केला. आणीबाणीत लोकशाहीची हत्या करणाऱ्यांनी भाजपामुळे लोकशाही धोक्यात येईल अशीही भीती दाखवली. निवडणुका जिंकण्यासाठी वोट जिहादचे समर्थन करण्यापर्यंत विरोधी पक्षांची मजल गेली. पण तरीही त्यांना मोदीजींना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून रोखता आले नाही.

या निवडणुकीत देशात भाजपाची २०१९ च्या तुलनेत ६८ लाख मते वाढली. महाराष्ट्रातही भाजपा गेल्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही १ कोटी ४९ लाख मते मिळवून मतांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिला. जनाधाराच्या बाबतीत भाजपा आणि एकूण एनडीची स्थिती चांगली राहिली. काही राज्यात निवडणुकीच्या विशिष्ट अंकगणितामुळे भाजपाने जिंकलेल्या जागा घटल्या असल्या तरीही जनाधार टिकून राहिला असल्यामुळे भाजपाला भविष्यात पुन्हा भरारी घेण्यासाठी भक्कम आधार उपलब्ध आहे.

विकसित भारताचा संकल्प यशस्वी करू
मा. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी जी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. आगामी पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा त्यांचा निर्धार आहे. भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा निश्चय आहे. भारताला विकसित देश करताना त्यामध्ये शेतकरी, महिला, युवक आणि गरीब यांना महत्त्वाचे स्थान असेल यावर त्यांचा भर आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने यशस्वी कामगिरी केली आहे. आगामी पाच वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार अशाच रितीने कामगिरी चालू ठेवेल आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षातील विकसित भारताची पायाभरणी करेल, असा विश्वास ही बैठक व्यक्त करते. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासाठी आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा निर्धारही ही बैठक व्यक्त करते. 

या होणाऱ्या अधिवेशनात तालुक्यातील आजी, माजी खासदार, आमदार, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधि, राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, सर्व मंडळ अध्यक्ष, तालुका आणि शहर कार्यकारिणी सदस्य, सर्व आघाडी, प्रकोष्ठ व सेल चे अध्यक्ष व कार्यकारिणी, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, सहकारी संस्थेचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन ता. अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post